नगरसेवकाच्या नावाने नागरिकांना धमकी
By admin | Published: April 26, 2016 03:12 AM2016-04-26T03:12:39+5:302016-04-26T03:12:39+5:30
नेरूळ सेक्टर २० मध्ये सोसायटीच्या गेटसमोर कार उभी करून रहिवाशांना धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला आहे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० मध्ये सोसायटीच्या गेटसमोर कार उभी करून रहिवाशांना धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला आहे. नगरसेवकांचे नाव घेवून महिलांनाही शिवीगाळ केलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
येथील नारायण स्मृती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या तरूणाने रविवारी त्याची कार (एमएच ४६ एडी १४४०) कृष्ण छाया इमारतीच्या गेटवर उभी केली. इमारतीमध्ये नागरिकांना ये - जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक ठेवला नाही. रहिवाशांनी विनंती करून गाडी थोडी पुढे घेण्याची विनंती केल्यानंतरही अर्धा तास तशीच उभी करण्यात आली. येथील एक नागरिकांकडे आलेल्या नातेवाइकाला त्याची मोटारसायकल बाहेर घ्यायची असल्याने त्यांनी सदर युवकाला विनंती केली की थोडीशी कार बाजूला घ्या, आम्हाला बाहेर निघू द्या. परंतु सदर युवकाने गाडी काढणार नाही. आम्ही आमची वाहने कुठे उभी करायची असा प्रश्न उपस्थित केला. मोटारसायकलस्वाराला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तुम्ही मला काय समजता ही नगरसेवकाची बिल्डिंग आहे. बोलावू का नगरसेवकांना अशी धमकीही त्याने यावेळी दिली.
गेटच्या समोर उभी केलेली कार बाजूला घेण्यासाठी सोसायटीमधील रहिवासी खाली उतरून विनंती करू लागले. परंतु मद्यपान केलेल्या या तरूणाने महिलांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. माझ्याविरोधात कुठे तक्रार करायची ते करा, पोलीस स्टेशनमध्येही जा, मला फरक पडत नसल्याचा दम दिला. या प्रकारामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या तरूणाविषयी संबंंधित नगरसेवक व पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.