भिवंडीतील कामवारी नदीला आला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:52 PM2017-07-18T13:52:35+5:302017-07-18T14:02:04+5:30

गेल्या 3 दिवसांपासून मुंबई शहर- उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या कोसळधार पावसामुळे तालुक्यातील कामवारी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.

Citizens warn of floods that flooded the Kamwari river in Bhiwandi | भिवंडीतील कामवारी नदीला आला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भिवंडीतील कामवारी नदीला आला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next
रोहिदास पाटील/ऑनलाइन लोकमत
भिवंडी (अनगांव), दि. 18 -  गेल्या तीन दिवसांपासून मुंबई शहर- उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या कोसळधार पावसामुळे तालुक्यातील कामवारी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.
 
नदीला पूर आल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्यानं नदीकिनारी वसलेल्या गावांना पुराचा इशारा वर्तवण्यात आला आहे. 
 
 
 
 
मुंबईमध्ये मंगळवारीदेखील जोरदार पाऊस पडत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस दीड ते 2 तास उशिराने आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. जोरदार पावसाने मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचले आहे. चेंबूर, खार, अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. 
 
 
पावसाचा वेग कायम राहणार असून, येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.दरम्यान,  सोमवारी ( 18 जुलै )गेल्या तीन वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
   
सोमवारी रौद्ररूप धारण केलेल्या पावसानं मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून काढले. मुंबईत प्रामुख्याने कुलाबा, घाटकोपर आणि गोरेगाव येथे मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने दिवसभर आपला मारा कायम ठेवला होता. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि लालबहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
 
 
सोमवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईवर सरींचा वर्षाव सुरू केला. कुलाबा, घाटकोपर आणि गोरगाव परिसरात सकाळच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळनंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र सायंकाळी पुन्हा रौद्ररूप धारण केलेल्या जलधारांनी भांडुप, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, लालबाग, भायखळा, फोर्टसह कुलाबा, मरिन ड्राइव्ह, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगावला झोडपून काढले.
 
पावसामुळे शहरात तीन, पश्चिम उपनगरांत दोन अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात नऊ, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सात अशी एकूण अठरा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही.
 
हवामानाचा अंदाज
 
१८ जुलै : कोकण,गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
 
१९-२० जुलै : संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
 
२१ जुलै : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता

 

 

मान्सून अपडेट
 
मान्सून सोमवारी पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या उर्वरित भागात, हरियाणाच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.

Web Title: Citizens warn of floods that flooded the Kamwari river in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.