नांदगाव शहरात एकाच रात्रीत 10 धाडसी घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 09:24 PM2016-05-12T21:24:39+5:302016-05-12T21:24:39+5:30
चोरट्यांनी घरातील मंडळी गावी गेल्याची संधी साधून तब्बल दहा घरे फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे तीस ते पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारला.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 12- नांदगाव येथील सुयोग कॉलनी, शांतीबाग व मोकळनगर या तीन कॉलन्यांमध्ये बुधवारी (दि. ११) रात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील मंडळी गावी गेल्याची संधी साधून तब्बल दहा घरे फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे तीस ते पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारला. दिवाळी, नवरात्र, जत्रा, उन्हाळी सुट्या यात चोऱ्या होण्याची ही पहिली वेळ नाही. यावेळी मात्र चोरट्यांच्या हाती मोठे घबाड गवसले नाही.
पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बाहीकर यांना समोरील प्रकाश बोडखे यांच्या घराचा दरवाजा जवळ तीन चार व्यक्ती काहीतरी करत असल्याचे लक्षात आले. तेव्हा बोडखे कुटुंबीय घराच्या गच्चीवर झोपले होते..... चोर चोर असे बाहीकर ओरडल्याने चोरटे नदीच्या दिशेने पळाले. ते सात ते आठ जण असावेत असा अंदाज आहे. वसंत विहारजवळ श्रीधर विसपुते यांना समोरच्या घराची कडी तुटल्याचे समजले.
आधी एक दोन घरे फोडल्याचे लक्षात आले. पण लवकरच ही संख्या अधिक असल्याचे समजल्यावर सगळ्या कॉलनीतील मंडळी हादरली. कोणाकोणाची घरे फुटली याची शोध मोहीम सुरू झाली. तेव्हा दहा घरे फुटल्याचे समजले.
राजेंद्र कदम (शिक्षक), विजयेंद्र चतुर्वेदी (रेल्वे इंजिन ड्रायव्हर), मधुकर डोंगरे (शेतकरी), मिलिंद पगार (नोकरी), राजेंद्र सुरसे (ठेकेदार), हरदास (एचडीएफसी), विजय कदम (शिक्षक), शरद उगले, सुरेंद्र बागडे, चंद्रकिशोर ठाकूर, राधाकिसन सुरासे यांची घरे फुटली. सर्व घरांच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडून चोरटे घरात शिरले. ते तोडण्यापूर्वी शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. चतुर्वेदी यांच्या घरातील मंगळसूत्र व दागिने, विजय कदम यांच्या घरातील चांदीचे दागिने व इतर घरांमधून किरकोळ रोख रकमा व छोटे दागिने असा मुद्देमाल चोरीला गेला.
एकाच रात्री सलग झालेल्या चोऱ्यांमधून चोरट्यांच्या हाती मोठे काही घबाड लागले नसले, तरी या संख्येने अधिक व संघटित चोऱ्यांचा धसका नांदगावकरांनी घेतला आहे. शहरात दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरू होती.
नुकतेच बदलून आलेले पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.