पोलीस आयुक्तांच्या दणक्याने शहर डिजीटल मुक्त
By Admin | Published: August 25, 2016 09:28 PM2016-08-25T21:28:55+5:302016-08-25T21:28:55+5:30
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या तंबीनंतर एकाच दिवसात शहर डिजीटल मुक्त झाले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी शहरातील अनाधिकृत
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 25 : पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या तंबीनंतर एकाच दिवसात शहर डिजीटल मुक्त झाले आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त विजयकुमार काळम, विभागीय अधिकारी, वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सेनगावकर यांनी धार्मिक स्थळांचा विषय दहा मिनिटात संपविला. शहरात नोंदणी नसलेली ११३0 धार्मिक स्थळे आहेत. यातील ५२५ धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत. नव्याने कागदपत्रांची पडताळणी करून १२२ स्थळांना नियमित करण्यास मान्यता देण्यात आली.
आता ६४७ धार्मिक स्थळे शिल्लक असून, त्यातील १0६ काढून टाकता येण्यासारखी आहेत. उर्वरित ३२१ स्थळांची चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. अनाधिकृत धार्मिक स्थळे काठून टाकण्यास मार्च २0१७ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे ही मोहीम सण,उत्सव झाल्यानंतर म्हणजे आॅक्टोबर—नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
त्यानंतर आयुक्त सेनगावकर यांना अनाधिकृत डिजीटलकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची निवड झालेली असताना असे विद्रुपीकरण शोभत नाही. महापालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे हे पीक फोफावले आहे. याबाबत झोन अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे असा शब्दात त्यांनी सुनावले.
यात कोणाचीही गय करू नका अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस आयुक्तांच्या रूद्रावताराची मनपा अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली. गुरूवारी दिवसभरात शहरातील डिजीटल गायब झाले. बुधवारपेठ, शिवाजी चौक, रंगभवन, कोंतम चौक येथून कार्यकर्त्यांनी स्वत:हून डिजीटल काढून घेतले तर जुळे सोलापूर, विजापूरनाका, कुमठानाका परिसरात मनपा अधिकाऱ्यांनी सूचना देऊन डिजीटल हटविले. अधिकाऱ्यानी सगळीकडे फेरफटका मारून याबाबत खातरजमा करून घेतली हे विशेष.