'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:21 PM2024-04-06T19:21:54+5:302024-04-06T19:23:39+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
CJI DY Chandrachud: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. वकील आणि न्यायाधीशांनी संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, न्यायाधीशांनी पक्षपाती नसावे असेही ते म्हणाले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी सोहळ्यात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.
यावेळी ते म्हणतात, भारतासारख्या चैतन्यशील आणि तर्कशुद्ध लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा कल कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारसरणीकडे असतो. ॲरिस्टॉटल म्हणाले होते की, मानव हा राजकीय प्राणी आहे आणि वकील याला अपवाद नाहीत. बारच्या सदस्यांनी न्यायालय आणि संविधानाबाबत पक्षपाती असू नये."
#WATCH | Maharashtra | At the inaugural event of the 3-day Centenary Year Celebration of the High Court Bar Association in Nagpur, CJI DY Chandrachud says, "It is Nagpur where Babasaheb embraced Buddhism... This year marks not only the centenary of the Bar Association but also… pic.twitter.com/0Ee9upu5iz
— ANI (@ANI) April 5, 2024
बार कौन्सिलच्या सदस्यांना सरन्यायाधीशांचा सल्ला
देशाच्या सरन्यायाधीशांनी भारताच्या न्यायव्यवस्थेवरही महत्त्वाचे भाष्य केले. ते म्हणाले की, न्यायपालिका आपल्या स्वातंत्र्यासाठी, कार्यकारिणी, कायदेमंडळ आणि निहित राजकीय हितसंबंधांपासून अधिकार वेगळे करण्यासाठी वेळोवेळी पुढे येत आहे. आपण हे विसरता कामा नये की, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि बारचे स्वातंत्र्य यांचा खोलवर संबंध आहे. एक संस्था म्हणून बारचे स्वातंत्र्य कायद्याचे राज्य आणि घटनात्मक शासनाचे रक्षण करण्यासाठी नैतिक ढाल म्हणून कार्य करते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका घेणाऱ्यांना सल्ला
CJI म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठांचे निर्णय कठोर कृती, खोल कायदेशीर विश्लेषण आणि घटनात्मक तत्त्वांना वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतात. निवाडा सुनावल्यानंतर ती सार्वजनिक मालमत्ता बनते. एक संस्था म्हणून आम्ही प्रशंसा आणि टीका दोन्ही स्वीकारतो. ही प्रशंसा आणि टीका पत्रकारितेतून असो, राजकीय असो वा सोशल मीडिया असो. आम्ही काही बोललो, तर त्याचा मोठा प्रभाव पडतो. बार असोसिएशनचे सदस्य, अधिकारी आणि वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सर्वसामान्यांच्या विरोधात भाष्य करू नये, असेही सरन्यायाधीश म्हणाले.