पाकव्याप्त काश्मीरवर दाव्याची पहिली मागणी माझी!
By admin | Published: August 14, 2016 01:18 AM2016-08-14T01:18:48+5:302016-08-14T01:18:48+5:30
पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही.
नागपूर : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही. सगळेच राजकीय पक्ष काश्मीरबाबतीत केवळ व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत, असा थेट आरोप अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या भेटीत केला.
काश्मिरी लोकांच्या सुरक्षेसाठीच तेथे सेनेचे जवान तैनात आहेत. हे विसरून जेव्हा त्या सैनिकांवर दगडफेक होते तेव्हा त्यांनी सुरक्षेसाठी पॅलेट गन चालवली तर यात गैर काय? पण, आपले राजकारणी याचेही राजकारण करीत आहेत. सैनिकांची बाजू न घेता दगडफेक करणाऱ्यांप्रती कळवळा दाखवला जात आहे. राजकारण्यांच्या अशा वागणुकीमुळे सैनिकांचे मनोबल खचत आहे. हे फार धोकादायक आहे, याकडे बिट्टा यांनी लक्ष वेधेले.
कलम ३७० हटवा
कलम ३७० ने काश्मीरचे खूप नुकसान केले आहे. स्वायत्ततेचा तेथे गैरफायदा घेतला जात आहे. सरकार कोणतेही असो काश्मीरसाठी विशेष पॅकेज देत असते. अशा पॅकेजमुळे त्या राज्यात ऐतखाऊ वृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक गैरफायदा येथील फुटीरवादी संघटना उचलत आहेत. एकीकडे सरकारच्या पॅकेजचा फायदा मिळवायचा आणि दुसरीकडे आयएसआयकडूनही निधी लाटायचा, असा गैरप्रकार काश्मिरात सुरू आहे. त्यामुळे ३७० कलम काढून टाकावे.
माझ्यावर चित्रपट का नाही?
‘उडता पंजाब’ चित्रपट नुकताच येऊन गेला. यात तर पंजाबचे असे चित्रण होते जणू येथील प्रत्येक घरात गर्दुले राहतात. व्यवसायाच्या दृष्टीने नकारात्मक विषय कॅश करता येतात हे फिल्म निर्मात्यांना चांगले माहीत आहे. म्हणूनच असे अवास्तविक चित्रपट काढले जातात. मी देशाच्या हिताचे बोलतो म्हणून माझ्यावर आतापर्यंत १६ हल्ले झाले. हे कुणा चित्रपट निर्मात्याला का दिसले नाही. बिट्टावर चित्रपट काढावा, असे कुणा निर्मात्याला का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.