ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला! मराठवाड्यातील पहिलाच पेपरलेस निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:48 AM2023-02-25T10:48:29+5:302023-02-25T10:48:49+5:30
माजलगाव येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी पक्षकाराने दावा दाखल केला होता.
पुरुषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) : एक महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी यापुढे न्यायालयाचे कामकाज पेपरलेस करावे, असे सूतोवाच केले होते. त्याच्या काही दिवसातच माजलगाव येथील दिवाणी न्यायालयात तीन आठवड्यांपूर्वी एक प्रकरण फाइल करण्यात आले होते. ही पेपरलेस फाइल बुधवारी न्यायालयासमोर आल्यानंतर त्याच दिवशी न्यायालयाने निकाल दिला. असा पेपरलेस निकाल देणारे माजलगाव न्यायालय मराठवाड्यात पहिलेच ठरले असल्याची चर्चा आहे.
माजलगाव येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी पक्षकाराने दावा दाखल केला होता. संबंधित वकील ॲड. एस. एस. सोळंके यांनी ई-फाइल या नवीन प्रणालीद्वारे ४ फेब्रुवारी रोजी दाखल केली. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. डी. घनवट यांच्यासमोर अपलोड केलेली ही फाइल २२ फेब्रुवारी रोजी आली असता त्यांनी ही फाइल पाहून संध्याकाळी सात वाजता यावर निकाल दिला. हा देण्यात आलेला पेपरलेस निकाल मराठवाड्यातील ई-प्रणालीमधील पहिला निकाल असल्याचे येथील वकील सांगतात. निकालादरम्यान दोन्ही पार्टीला कोर्टात येण्याची आवश्यकता लागली नाही. या प्रकरणात ॲड. एस. एस. सोळंके व ॲड. विक्रम कदम यांनी पाहिले.
वकील कोठूनही काम पाहू शकतात
ई-प्रणालीद्वारे न्यायालय सुरू झाल्यास आता कुठल्याही न्यायालयात कुठलाही वकील काम पाहू शकेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून होणारा खर्च, वेळ वाचणार आहे.
घरबसल्या दिसणार निकाल
ई-प्रणालीद्वारे लागलेला निकाल तत्काळ न्यायालयाच्या वेबसाइटवर दिसणार आहे. यामध्ये न्यायालयाला कोणती कागदपत्रे देण्यात आली व न्यायालयाने काय निकाल दिला हेदेखील दिसणार आहे.
ई-प्रणालीद्वारे न्यायालय चालवल्यास यापुढे पक्षकारांना दिवाणी दाव्यात न्यायालयात यायची गरज राहणार नाही. तर फौजदारी दाव्यात आरोपींना न्यायालयात हजर करावे लागेल. यापुढे या प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वेगवेगळ्या सुधारणा होणार आहेत. सर्व वकिलांनी हे प्रणाली आत्मसात करावी. - एस. डी. घनवट, न्यायाधीश, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर माजलगाव.