पक्षांतर बंदी कायदा गैरलागू असल्याचा दावा; शिंदे गटाच्या वकिलांनी केला युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:20 AM2023-03-02T06:20:07+5:302023-03-02T06:21:00+5:30
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शिंदे गटाकडून मंगळवारपासून युक्तिवाद सुरू झाला. तोच बुधवारी कौल यांनी पुढे नेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या विरोधात बंड केले नव्हते तर लोकप्रतिनिधींचा विश्वास गमावलेल्या पक्षानेतृत्वासमोर पर्यायी गट उभा केला. याला शिवसेनेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधींचे समर्थन होते. याला निवडणूक आयोगाने मान्यता देऊन खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असल्याचा निर्वाळा दिलेला असल्याने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी व राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीच्या तरतुदी गैरलागू असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी बुधवारी केला.
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शिंदे गटाकडून मंगळवारपासून युक्तिवाद सुरू झाला. तोच बुधवारी कौल यांनी पुढे नेला. शिवसेनेत फूट पडली नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यात दखल नको
आमदार अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. त्यात कोर्टाची दखल योग्य नाही, असे कौल म्हणाले.
- संबंधित बातमी/आतील पान
शिवसेनेत कोणतीही फूट नाही
n शिंदे गटाची निर्मिती ही फुटीरतेतून किंवा बंडातून झालेली नसल्याचा दावा करून कौल म्हणाले, शिवसेनेत फूट पडली, असा आमचा कधीही दावा नव्हता व नाही.
n आम्हीच शिवसेना आहोत, हाच दावा पहिल्या दिवसापासून केला. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देऊन निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केल्याचे कौल यांनी घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिले.
n राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीतील तरतुदी फुटीर किंवा बंड केलेल्या गटाला लागू होतात. त्यामुळे १०व्या अनुसूचीतील तरतुदी शिंदे गटाला लागू नाहीत.