नीता अंबानी यांचे 'ते' ट्विटर अकाउंट फेक ; रिलायन्सकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 07:13 PM2020-04-03T19:13:07+5:302020-04-03T19:30:08+5:30
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांच्या नावाचा वापर करून फेक ट्विटर काढण्यात आले असून त्यावरून प्रसारित करण्यात येणारा मजकूराशी अंबानी यांचा काहीही संबंध नाही.
पुणे :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांच्या नावाचा वापर करून फेक ट्विटर काढण्यात आले असून त्यावरून प्रसारित करण्यात येणारा मजकूराशी अंबानी यांचा काहीही संबंध नाही. याबाबत रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने अधिकृत खुलासा केला असून या ट्विटकडे दुर्लक्ष करावे असेही सांगण्यात आले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील 'आलमी मरकज' या तबलिगी जमातीच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या सुमारे ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित राज्यांनी केंद्राला माहिती कळवली आहे. याच मुद्द्यावरून अंबानी यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात काही मते मांडण्यात आली आहेत. त्यात ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरील संदेशाला रिट्विट करण्यात आहे. त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी रिलायन्सने स्पष्टीकरण दिले आहे.
रिलायन्सने याबाबत जारी केलेला खुलासा खालीलप्रमाणे :
श्रीमती नीता अंबानी यांच्या कथित ट्विटर हॅण्डलवरून अनेक बनावट ट्विट केलेले पाहण्यात आले आहेत. आम्ही कळवू इच्छितो की, श्रीमती नीता अंबानी यांच्याकडे कोणतेही अधिकृत ट्विटर खाते नाही. त्यांचे नाव किंवा छायाचित्र असलेली सर्व ट्विटर खाती बनावट आहेत. कोणत्याही बनावट ट्विटर हॅण्डलवरून जाणीवपूर्वक प्रसारित केल्या जाणाऱ्या ट्विटकडे कृपया दुर्लक्ष करावे ही विनंती.
प्रवक्ते,
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड