दहावी सीबीएसई बोर्डाच्या निकालाचा टक्का घसरला
By Admin | Published: June 3, 2017 09:52 AM2017-06-03T09:52:38+5:302017-06-03T15:51:51+5:30
आज दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- आज दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर व्हायला सुरूवात झाली आहे. सीबीएसई बोर्डाचा पाच विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, देहरादून, त्रिवेंद्रम या पाच राज्यांचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी सीबीएसई बोर्डाच्या निकाला टक्का घसरला आहे. यंदा 90. 95 टक्के निकाल लागला आहे तर गेल्यावर्षी 96.21 टक्के निकाल लागला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
12 वीच्या निकालानंतर दहावीची मुलं निकालाची वाट पाहत होती. मुलांची प्रतिक्षा आज संपणार आहे. यावर्षी ही परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून १६.५ लाख विद्यार्थी बसले होते.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ जून रोजी दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. cbseresults.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.
सीबीएसईने १२ वीचा निकाल २८ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता १० वीच्या निकालाची तारीख घोषित केली आहे. ऑनलाईन निकाल पाहत असताना विद्यार्थ्यांनी आपलं नाव, जन्मतारीख, परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती तपासून घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत गुणपत्रिका उपलब्ध होतील.
दहावी परिक्षेच्या निकालाबाबतीत झालेल्या सुधारणा धोरणाच्या वादामुळे यंदा बारावी सीबीएसईचा निकालही लांबणीवर गेला होता. कॉलेजच्या हाय कट ऑफ लिस्टमुळे मॉडरेशन पॉलिसी बंद केली होती. या पॉलिसीनुसार कठीण प्रश्नांवर विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातात.
पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने मॉडरेशन पॉलिसी कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. यावर्षीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांचं मुल्यमापन ग्रेस मार्क्स पॉलिसीच्या आधारावर होइल, असं कोर्टाने आदेशात सांगितलं होतं. मॉडरेशन पॉलिसीमध्ये कठीण प्रश्नावर विद्यार्थ्यांना 15 टक्के मार्क देण्याचा नियम आहे. यावर्षी या निर्णयाचा बारावीच्या ११ लाख विद्यार्थ्यांना आणि १० वीच्या ९ लाख विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.