कलागुणांमुळे रखडला दहावीचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 10:03 PM2017-06-07T22:03:31+5:302017-06-07T22:03:31+5:30
राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाढीव गुणांचा समावेश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये करण्याचे काम बोर्डाकडून सुरू असल्याने दहावीच्या निकालास विलंब होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो, यंदाही बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणे अपेक्षित होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कला गुणांचे वाढीव गुण समाविष्ट करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्याने निकाल वेळेवर लावण्यास विलंब लागत आहे.
राज्य शासनाने ७ जानेवारी २०१७ रोजी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रात प्राविण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यपध्दती निश्चित केली. या निर्णयाची कार्यवाही मार्च २०१८ मध्ये होणाºया दहावीच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक १४ मार्च २०१७ रोजी शासनाकडून शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले, त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्च २०१८ ऐवजी मार्च २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढले.
यंदाच्या वर्षी मुंबई विभागातून सर्वाधिक ३० हजार विद्यार्थी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागातून २५ हजार तर कोकण विभागातून ५ हजार विद्यार्थींचा समावेश आहे. त्यांच्या गुणपत्रिकेमध्ये या कलागुणांची नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. कला गुणांची नोंद पहिल्यांदाच केली जात असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार काळजीपूर्वक त्या गुणांची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वेळ लागत असल्याने यंदा दहावीच्या निकालास विलंब झाला आहे.
दहावीचा निकाला पुढच्या आठवडयात लावला जाईल त्याबाबतची निकालाची तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर करू तरी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावरून उठणाºया अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.