इयत्ता दहावी : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांने दिली रुग्णालयात परीक्षा
By admin | Published: March 14, 2017 09:14 PM2017-03-14T21:14:56+5:302017-03-14T21:17:48+5:30
जेलरोड के.एन.केला शाळेमध्ये दहावीचा गणिताचा पेपर देण्यासाठी जात असलेला विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याला मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेजवळ
नाशिक : जेलरोड के.एन.केला शाळेमध्ये दहावीचा गणिताचा पेपर देण्यासाठी जात असलेला विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याला मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेजवळच वाहनाने धडक दिल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी बोर्डाकडून विशेष परवानगी घेतली आणि त्याने रुग्णालयातूनच गणिताचा पेपर दिला.
जेलरोड अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याचा मंगळवारी सकाळी ११ ते २ पेपर असल्याने जेलरोड के.एन. केला शाळेमध्ये अनिकेतच्या वडिलांनी त्याला शाळेजवळ रस्त्यावर उतरविले. तेथुन अनिकेत रस्ता ओलांडत असताना के.एन. केला शाळेचे क्रीडा शिक्षक अजिज सय्यद हे आपल्या फिगो गाडीतुन (एमएच १५ सीएम ८९६१) प्रश्नपत्रिका घेऊन येत होते. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारा जवळच अनिकेतला वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. उपस्थित पालक व शाळेतील शिक्षकांनी त्याला त्वरित उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. शाळेतील पर्यवेक्षक आर. पी. गायकवाड यांनी सदरची घटना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना कळविली. अनिकेत याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जाधव यांनी तत्काळ बोर्डाकडून परवानगी घेऊन अनिकेतला हॉस्पिटलमध्येच पेपर देण्याची परवानगी मिळवुन दिली.
अनिकेतवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हा परीक्षक उपशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये सुपरवायझर नेमुन अनिकेतला गणिताचा पेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच पेपर सोडविण्यासाठी ९ वीची विद्यार्थिनी रायटर म्हणून देण्यात आली होती. सदर अपघाताबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)