दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी होणार २७ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:02 AM2019-12-20T06:02:33+5:302019-12-20T06:02:42+5:30
मोबाइल, कॉम्प्युटर दोन्ही पर्याय शिक्षण मंडळाकडून उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे हे तपासण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात येणारी कलमापन व अभिक्षमता चाचणी यंदा २७ डिसेंबर २०१९ ते १८ जानेवारी २०२० दरम्यान राज्यभरात घेण्यात येणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सर्व विभागीय सचिवांना कळविण्यात आले आहे. ही चाचणी मागील वर्षापासून मोबाइल अॅपच्या माध्यमातून होत असून यंदाही ती मोबाइल आणि कॉम्प्युटर या दोन्ही माध्यमांतून घेता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळांनी मोबाइल किंवा कॉम्प्युटर यापैकी सोयीस्कर पर्याय किंवा दोन्हीचा वापर करावा, असे राज्य मंडळाकडून सुचविण्यात आले आहे. याची विस्तृत माहिती त्यांना ६६६.ेंँंूं१ीी१े्र३१ं.्रल्ल/ँी’स्र या संकेतस्थळावर पीपीटी आणि व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आल्याचे मंडळाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या चाचण्यांच्या प्रभावी अंलबजावणीसाठी मंडळाने प्रत्येक विभागस्तरावर एक विभाग समन्वयक व जिल्हा स्तरावर एक जिल्हा सन्मवयकांची निवड केली आहे. काही अडचणी आल्यास विभागीय सचिवांनी त्यांना संपर्क साधावा तसेच या चाचणीच्या नियोजनासंदर्भात सर्व विभागीय मंडळांत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीनंतर विभागीय स्तराच्या अखत्यारीतील जिल्हा शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी आणि तालुका समुपदेशक यांची विभागीय मंडळ स्तरावर २४ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
कलमापन चाचणी म्हणजे काय?
राज्य सरकारतर्फे सन २०१६ पासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसोबत त्यांचा कल कुठे आहे हे सांगणारा कलचाचणी निकाल देण्यास सुरुवात झाली. गरीब विद्यार्थ्यांना हजारो रुपये खर्च करून कलचाचण्या करून घेणे शक्य नसते. यामुळे राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन शाळांमध्ये ही चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे, हे समजणे सोपे झाले. मात्र, या चाचणी निकालावर मंत्र्यांचे फोटो कशाला, असा सवाल करत यंदा तरी ही परंपरा बदलणार का, असा प्रश्न अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी उपस्थित केला.