दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक आठवड्याभरात
By Admin | Published: October 17, 2016 01:00 AM2016-10-17T01:00:08+5:302016-10-17T01:00:08+5:30
शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जात होते
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जात होते. राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. परंतु, येत्या आठवड्याभरात मंडळातर्फे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून राज्य मंडळाकडून शाळा, महाविद्यालयांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजित वेळापत्रक दिले जात आहे. परंतु, पहिले सत्र संपत आले तरी अद्याप फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाने अद्याप प्रसिद्ध केले नाही. सोशल मीडियावर खोटे वेळापत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलथापांंना बळी पडू नये. लवकरच अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले.
राज्यातील प्रस्तावित निवडणुका सर्वसाधारणपणे कोणत्या कालावधीत असतील, याबाबतची माहिती राज्य मंडळाला प्राप्त झाली आहे, असे नमूद करून म्हमाणे म्हणाले, मंडळाने कच्चे वेळापत्रक तयार केले असून सर्व विभागीय मंडळांकडून त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. स्थानिक पातळीवरील सुट्यांचा विचार करून त्यात काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात परीक्षेचे नियोजित वेळापत्रक आॅनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केले जाईल.
(प्रतिनिधी)