अकरावीचे वर्ग ९ आॅगस्टपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:48 AM2017-08-05T03:48:55+5:302017-08-05T03:48:55+5:30
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे.
पुणे : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही त्यांचे काय? त्यांचा अभ्यासक्रम मागे पडून शैक्षणिक नुकसान झाले याची जबाबदारी कुणाची? अशी विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे.
तिसºया फेरीनंतरही अनेकांना अद्याप महाविद्यालय मिळू न शकल्याने विद्यार्थी व पालक चांगलेच धास्तावले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र, समितीने लगेच महाविद्यालय सुरू करण्याचा आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे ११ वीचे ७५ टक्के प्रवेश झाले आहेत, त्यांचे सत्र येत्या ९ आॅगस्टपासून सुरू करण्याचा आदेश समितीने दिला आहे.
सध्या चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पसंतिक्रम बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संधी देण्यात आली होती. केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६०, तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहेत. तर, ३० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.