अकरावी, बारावीचे वर्ग पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2016 02:06 AM2016-10-05T02:06:09+5:302016-10-05T02:06:09+5:30
दुपारची वेळ... शहरातील नामांकित महाविद्यालयांना शिक्षण अधिकारी मंगळवारी अचानक भेट देतात... त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते.
पुणे : दुपारची वेळ... शहरातील नामांकित महाविद्यालयांना शिक्षण अधिकारी मंगळवारी अचानक भेट देतात... त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते. अकरावी-बारावीच्या वर्गात पाहणी करून झाडाझडती घेतली जाते; मात्र एकूण पटसंख्येच्या एक तृतीयांश विद्यार्थीही वर्गात हजर नसल्याचे पाहून अधिकारी चक्रावून जातात. याबाबत विचारणा केली असता अनेक जन खासगी क्लसेसला प्राधान्य देत असल्याची कबुली विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविलेल्या अकरावी आॅनलाइन
प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून शहरातील नामांकित महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, असा अट्टहास विद्यार्थी व पालकांकडून धरला जातो. नामांकित महाविद्यालयातील विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेऊन पालक हजारो रुपये शुल्क भरतात. विद्यार्थ्यांनी दररोज महाविद्यालयाच्या वेळापत्रका प्रमाणे तासांना येऊन बसणे आवश्यक असते; परंतु बहुतेक विद्यार्थी वर्गाबाहेरच फिरतात किंवा महाविद्यालयाच्या वेळेत खासगी क्लासेसमध्ये जाऊन शिकवणीला प्राधान्य देतात. याचाच आढावा घेण्यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या एका पथकाने मंगळवारी शहरातील महाविद्यालयाच्या झाडाझडतीस सुरुवात केली. पहिल्या दिवशी नौरोसजी वाडिया व नेस वाडिया महाविद्यालयांना भेट दिली. पुढील काही दिवसांत ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. परिणामी शहरातील इतरही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे चित्र समोर येणार आहे. पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक मीनाक्षी राऊत, आर. जी. जाधव, माजी प्राचार्या सतिंदरजीत कौल आदींनी वाडिया कॉलेजमधील वर्ग व प्रयोगशाळांना प्रत्यक्ष भेट दिली.
(प्रतिनिधी)
अनुपस्थितीमुळे घटली टक्केवारी
अकरावीचे काही विद्यार्थी दररोज वर्गात हजर राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी घटत चालेली असल्याचे वाडिया कॉलेजमध्ये दिसून आले. बारावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यांला दहावीत ७९ टक्के गुण मिळाले होते.
मात्र, त्याच विद्यार्थ्याला अकरावीत ५८टक्के गुण मिळाले. अशीच स्थिती आणखी काही विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थी दररोज
वर्गात हजर राहिले, तर निकालाची टक्केवारी आपोआप वाढेल, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या.
बहुतेक विद्यार्थी केवळ कॉलेजच्या प्रॅक्टिकल्सला उपस्थित राहत आहेत. खासगी क्लासेसचा वेळ आणि महाविद्यालयांचे तास एकाच वेळी असल्याने विद्यार्थी कॉलेजमध्ये गैरहजर राहत आहेत. वाडिया कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी आम्ही खासगी क्लासमध्ये जातो. त्यामुळे कॉलेजमध्ये गैरजहजर राहतो, असे सांगितले. तसेच, एका खेळाडू विद्यार्थिनीने मी खेळाचा सराव करण्यासाठी जात असल्याने वर्गात बसू शकत नसल्याचे सांगितले.
नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या अकरावीच्या विज्ञान शाखेच्या वर्गातील काही तुकड्यांमध्ये केवळ ३० ते ३५ विद्यार्थी हजर होते. तर, काही विद्यार्थी वर्गाबाहेर ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती यात चांगलाच फरक दिसून आला. बहुतेक विद्यार्थी केवळ प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात येत असल्याचे दिसून आले.
आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हजेरी नेहमीच चांगली असते. विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आली आहे. नियमितपणे पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत त्यांना कल्पना दिली जाते. परीक्षांचा कालावधी जवळ असल्याने सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे.
- डॉ. एम. एम. अंडार,
प्राचार्य, नेस वाडिया कॉलेज