वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालू
By Admin | Published: August 6, 2015 12:47 AM2015-08-06T00:47:46+5:302015-08-06T02:35:20+5:30
वाङ्मयीन सभ्यता जपत वेगवेगळे लक्षवेधी व यशस्वी प्रयोग करणारे महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या साकेत प्रकाशनाचे संस्थापक, सिद्धहस्त लेखक बाबा भांड यांच्या
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद
वाङ्मयीन सभ्यता जपत वेगवेगळे लक्षवेधी व यशस्वी प्रयोग करणारे महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या साकेत प्रकाशनाचे संस्थापक, सिद्धहस्त लेखक बाबा भांड यांच्या खांद्यावर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचित.
प्रश्न - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्या पदावर काम करण्याची संधी आपणास मिळाली आहे, काय वाटते?
उत्तर - मोठ्या संधी सोबतच ही मोठी जबाबदारीही आहे. अनेक दिग्गज, विचारवंतांनी या पदावर काम केले आहे. त्यामुळे या पदाचे मोठेपण आहे. आजच्या बदलत्या अभिरुचीची सांगड अभिजात साहित्याशी घालण्याचा प्रयत्न माझा राहील.
प्रश्न - मराठीची वाङ्मयीन संस्कृती कशी जपणार?
उत्तर - साहित्य-संस्कृतीविषयक चिंतन करणारे, काम करणारे हे भारतातील राज्य पातळीवरील पहिले मंडळ आहे. मराठी भाषेतील मूलभूत संशोधन प्रकाशनाचे काम या महामंडळाच्या माध्यमातून झाले. या कामाची गती वाढविण्यासह वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालावी लागणार आहे. लेखकांना लिहिते करण्यापासून वाचकसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या गोष्टी वाढविणे हा संस्कृतीचा एक भाग आहे.
प्रश्न : अध्यक्ष म्हणून मंडळातर्फे कोणत्या प्रकल्प, योजनांवर आपण काम करणार आहात?
उत्तर - काही प्रकल्प राबविण्याची संकल्पना तयार आहे. विशेषत: सर्जनशील नवलेखनासाठी विभागीय पातळीवर अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळांचे आयोजन करणे, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या शासनाच्या संस्थांना सोबत घेऊन काही लेखन-वाचन प्रकल्प संयुक्त राबविणे, विविध पुरस्कार-बक्षिसे या समित्यांवर दर्जेदार लेखकांना घेऊन नि:पक्ष कलाकृतींची निवड करणे, लेखक-प्रकाशने आणि वाचनालये यांच्यातील संपर्क वाढविण्यासाठी काही योजना आखणे शक्य होतील का, असा विचार मी करतो आहे. नाशिक, सोलापूर, कोल्हापूर येथील वाचन संस्कृती कशी वाढेल, याचा शोध घेण्यासाठी काही पथदर्शी प्रकल्प राबविला जाऊ शकतो काय, हे पाहता येईल.
प्रश्न - ‘आॅनलाईनच्या व्हर्च्युअल’ युगात पुस्तकांकडे तरुण पिढीला कसं वळविणार?
उत्तर - तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे तरुण पिढीने पुस्तकेच वाचावी, असे म्हणणे योग्य नाही. तरुण पिढीने वाचण्याची सवय जपावी व ती सतत वाढवत न्यावी हे महत्त्वाचे. जुने अभिजात साहित्य ‘ई- बुक’च्या रुपाने तरुणाच्या हाती दिली पाहिजेत. त्यासाठी सर्व पुस्तकांचे डिजिटलायझेशन झाले पाहिजे.
प्रश्न - हे मंडळ अधिक लोकाभिमुख करण्यासाठी.
उत्तर - मंडळाची पायाभरणी उत्कृष्ट झाली आहे; परंतु अधिक लोकाभिमुखतेसाठी अधिक प्रयत्न करू. बसस्थानक, रेल्वेस्थानकांसह गरजेच्या वस्तू विक्री होतात, त्या दुकानांना लागून मंडळाच्या साहित्यकृती विक्री का असू नये?