खान्देशातील तापी, गोदावरी, अनेर नदीतील १२० प्रजातींच्या माशांना शास्त्रीय ओळख
By Admin | Published: June 16, 2017 10:36 AM2017-06-16T10:36:49+5:302017-06-16T13:27:38+5:30
उत्तर महाराष्ट्रात तापी, गोदावरी, अनेर या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांमध्ये माशांचे प्रमाणही अधिक आहे.
- संजय सोनावणे/ आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.16 - उत्तर महाराष्ट्रात तापी, गोदावरी, अनेर या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांमध्ये माशांचे प्रमाणही अधिक आहे. या नद्यांमधील सुमारे १२० प्रकारच्या मत्स प्रजातींचे गुणसूत्रद्वारे (डीएनए) बारकोड विकसित करून, त्याची जागतिकस्तरावर शास्त्रीय ओळख निर्माण करण्याचे संशोधन चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी.एस. लोहार यांनी केले आहे.
शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यानंतर कळते. एखादी जाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत जाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षांत औद्योगिकीकरणाच्या विकासाबरोबर निसर्गाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली व त्यामुळे जैवविविधतेचे १५ टक्के नुकसान झाले आहे व काही जाती नष्ट झाल्यात.
भारतात माशांच्या २२०० तर महाराष्ट्रात ३५० प्रजाती आढळतात.
प्रा.डॉ. लोहार यांनी २०१० ते २०१६ या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी, गोदावरी व अनेर नद्यांमधील मत्स्यप्रजातींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. यापैकी लेबियो (रोहू), कटला, मृगल या सारख्या १२० मत्स्यप्रजातींचे संकलन करून प्रयोगशाळेत त्यांच्या पेशीतून गुणसूत्र (डीएनए) काढून त्यांचे आधुनिक उपकारांद्वारे व उत्प्रेरकांची प्रक्रियाकरून डीएनएचे बॅड म्हणजेच एक विशिष्ट बारकोड विकसित केलेत. त्या-त्या मत्स्यप्रजातींसाठी एक बारकोड निधार्रीत केला. त्यामुळे जागतिकस्तरावर त्या मत्सप्रजातींना शास्त्रीय ओळख निर्माण झाली. अश्या प्रकारे तयार केलेले बारकोड भारतातील मत्स्यप्रजातींची अचूक ओळख, वर्गीकरण व त्यांच्या विविधतेचे रक्षण करण्यासाठी वापरले जातील.
हिमाचल प्रदेशच्या शासकीय विज्ञान व पर्यावरण विभागातर्फे शिमला येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. लोहार यांनी हे संशोधन सादर केले होते. या परिषदेला १८० देशांचे प्रतिनिधी हजर होते. उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे संशोधन करणारे प्रा.डॉ. पी.एस. लोहार हे एकमेव आहेत.
जागतिक जैवविविधता दशक
पर्यावरणाचे रक्षण व जैवविविधतेचा योग्य वापर, संवर्धन तथा संरक्षण करणेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २०११ ते २०२० हे जागतिक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केलेले आहे. या पार्श्वभूमीमुळे हे संशोधन विशेष ठरत आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेत्रात मत्स प्रजातीचे शास्त्रीय बारकोड विकसित करण्यात यश मिळाले. तालुकास्तरावरील महाविद्यालयात सेवा बजावत जागतिकस्तरावर ओळख टिकवून ठेवण्यासाठी अशा संशोधनाची गरज असते. या कामाची अमेरिकेच्या गुगल स्कोलर व जर्मनीच्या रिसर्चगेटच्या माध्यमातून जगभरातील शास्त्रज्ञांनी दखल घेतली असल्याचे प्रा.डॉ.पी.एस. लोहार यांनी सांगितले.