शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत - लता मंगेशकर
By Admin | Published: May 13, 2017 02:30 AM2017-05-13T02:30:48+5:302017-05-13T02:30:48+5:30
शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. गुरुकुल पद्धतीने शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ‘प्रभुकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाले. त्या वेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. लतादीदी गुरुकुल अकादमीच्या अध्यक्षा आहेत.
त्या म्हणाल्या, ‘या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. या ठिकाणी प्रत्येक गुरूने त्याला जे काही येते, ते शिष्याला शिकवण्याचा प्रयत्न करावा, तर शिष्यांनीही लहान होऊन जे-जे शिकता येईल, ते शिकून घ्यावे. देशातील पहिला-वहिला प्रयोग असलेल्या या गुरुकुलमार्फत शास्त्रीय संगीताचा वारसा टिकवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आणि देशातील जेवढे संत आहेत, त्यांची मी भक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण भारतीय राहावे, हेच भारतीय संस्कृती शिकवते. मात्र, संगीताच्या नावावर हल्ली जे काही चालले आहे, ते चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली. पृथ्वी गोल असून, लोकांसमोर जे येते, त्याचा ते स्वीकार करत असतात,’ असे त्यांनी सांगितले.
येथे गुरू कमाल १५ शिष्यांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येहून अधिक भर हा त्यांच्यातील सुप्त गुणांना दिला जाईल. त्यानुसारच त्यांची निवडही केली जाईल, असे अकादमीचे संचालक सुरेंद्र मोहिते यांनी सांगितले. तर गुरूकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे देण्यासाठी भव्य वास्तू तयार होईल, असे स्वप्नातही वाटले नसल्याचे ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणाले.
या वेळी एमएईईआर एमआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, अकादमीच्या संचालिका ज्योती ढाकणे, सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिग्गजांकडून प्रशिक्षण
या अकादमीमध्ये शास्त्रीय संगीतामधील दिग्गज कलाकार मोफत प्रशिक्षण देतील. त्यात व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, सुगम संगीतामधील ज्येष्ठ गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर, तालयोगी पंडित सुरेश तळवळकर, पंडित उल्हास कशालकर, ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे, ज्येष्ठ गायिका देवकी पंडित आदींचा समावेश आहे.
... तोपर्यंत प्रशिक्षण सुरूच राहील
एकविसावे शतक भारतीय संस्कृतीमधील सुवर्णकाळ असेल, असे वक्तव्य स्वामी विवेकानंद यांनी केल्याची आठवण अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी करून दिली. ते म्हणाले, विवेकानंदांचे वाक्य काही अर्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
आजचा दिवस नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. या अकादमीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. संस्थेचे गुरू विद्यार्थ्यांची निवड करतील. प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कोणताही कालावधी नसून, जोपर्यंत गुरूला वाटत नाही, तोपर्यंत प्रशिक्षण सुरू राहील, असे डॉ. कराड म्हणाले