लग्नातील अहेराच्या पैशांतून बांधल्या वर्गखोल्या

By admin | Published: July 14, 2017 05:02 AM2017-07-14T05:02:33+5:302017-07-14T05:02:33+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला

Classrooms built by money from the wedding | लग्नातील अहेराच्या पैशांतून बांधल्या वर्गखोल्या

लग्नातील अहेराच्या पैशांतून बांधल्या वर्गखोल्या

Next

वसंत भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : लग्नात मिळालेल्या अहेराच्या रकमेतून वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे.
शिर्वन व सायली ठाणेकर यांनी शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या या आश्रमशाळेची वर्गखोल्यांची कमतरता लक्षात घेऊन इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च करून दोन खोल्या बांधून दिल्या.
आदिवासी विद्यार्थ्यांबाबत संवेदनशील असणाऱ्या ठाण्यातील वीणाताई ज्ञाते या वाडा तालुक्यातील नांदणी-गायगोठा (कळंभई) येथील अरविंद स्मृती संचलित आश्रमशाळेच्या संपर्कात आल्या. तेथील अडचणी पाहून दरवर्षी त्यांना औषधे, सतरंज्या, पांघरूणे मिळवून देणे अशी मदत करीत असतात. यामध्ये त्यांचे सीए असलेले पती मिलिंद हे त्यांना मदत करीत असतात. अशातच २०१५ साली वीणातार्इंची कन्या सायली ज्ञाते हिचा विवाह ठाण्यातील शिर्वन ठाणेकर यांच्याशी ठरला. त्यावेळी वीणातार्इंनी शिर्वनच्या पालकांशी संवाद साधून अहेराची रक्कम आश्रमशाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी सुचविले. लग्नपत्रिकेतही अहेराची रक्कम या सामाजिक कार्यासाठी वापरणार असल्याची कल्पना अन्य आप्तांना दिली. अहेराच्या रकमेत आपल्याकडील रकमेची भर घालून वर्गखोल्यांचे बांधकाम केले. दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९९८ साली ही आश्रमशाळा सुरू झाली. आज ६५० विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ३१० विद्यार्थिनी आहेत. आज सुसज्ज अशा बांधलेल्या वर्गखोल्यांमध्ये येथील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शिक्षण घेत आहेत.
>आश्रमशाळेतील समस्या सोडविण्यासाठी वीणाताई ज्ञाते या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करीत असतात. त्यांच्या या कार्यामुळे आम्हालाही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन संस्कारित करण्यासाठी प्रेरणा मिळते.
- संगीता भोईर, मुख्याध्यापिका

Web Title: Classrooms built by money from the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.