चौपाट्यांची नीट साफसफाई करा
By admin | Published: July 4, 2016 05:00 AM2016-07-04T05:00:50+5:302016-07-04T05:00:50+5:30
सर्व चौपाट्यांवरील साफसफाई अधिक चांगल्या प्रकारे व सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित उपायुक्तांना दिले
मुंबई : महापालिका क्षेत्रातील सर्व चौपाट्यांवरील साफसफाई अधिक चांगल्या प्रकारे व सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित उपायुक्तांना दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले.
गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटीप्रमाणेच विस्तारित वर्सोवा चौपाटीवरदेखील मशीनद्वारे साफसफाई करण्यात यावी; तसेच या चौपाटीच्या साफसफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिले जावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी व खड्डे तत्काळ भरण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी प्राधान्याने करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिका क्षेत्रातील विविध व्यावसायिक आस्थापना विशेषत: मॉल्स, मल्टिप्लेक्स येथील वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार आवश्यक असणाऱ्या मोकळ्या जागा याबाबत कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे तसेच अग्निसुरक्षा उपकरणे अद्ययावत व कार्यरत असल्याची खात्री करून घेण्याचे आदेश महापालिकेच्या सर्व विभागीय आयुक्तांना व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले.
सहआयुक्त शांताराम शिंदे हे सेवानिवृत्त होत असल्याने आयुक्तांच्या हस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)