स्वच्छ भारत मोहीम : स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:15 AM2018-08-18T05:15:17+5:302018-08-18T05:15:45+5:30
स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करणार आहे. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे.
मुंबई - स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करणार आहे. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही या संबंधित सूचना जारी केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील १ ते १५ हे दिवस ‘स्वच्छ भारत’ पंधरवडा साजरा होणार आहे. स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, १ सप्टेंबरला सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये स्वच्छता शपथ घ्यायची आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होतील.
पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती/ पालक शिक्षक संघ आणि शिक्षकांमध्ये बैठका आयोजित करून, मुले, शिक्षकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येईल. शाळा आणि घरांमध्ये स्वच्छता कशी असावी, यासाठी मुलांना प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी शाळेतील/शैक्षणिक संस्थेतील स्वच्छतेच्या सुविधांची तपासणी करावी, तसेच आवश्यकता वाटल्यास सुविधांच्या-देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव/योजना तयार करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा/तालुका/पंचायत स्तरावर स्वच्छ परिसर आणि व्यवस्थित शौचालयांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे, स्वच्छतेवर वाद-विवाद स्पर्धा आयोजित करणे, स्वच्छतेविषयीचे संदेश शाळेच्या/शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्वच्छतेविषयीची छायाचित्रे शाळेमध्ये प्रकाशित करणे असे उपक्रमही आयोजित करण्यास सांगितले आहे.
स्वच्छता पंधरवड्यात मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने काय करावे, यासंबंधी दिलेल्या सूचना
जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत.
नियमानुसार जुन्या फाइल्स आणि अभिलेख दप्तरी दाखल करावे.
शाळा परिसरातून सर्व प्रकारचे टाकाऊ सामान जसे मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने हटविण्यात यावे.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वच्छता पंधरवड्याचा प्रचार जवळील नागरी वस्तीत करावा.
ओला कचरा/सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याविषयी जागरूकता निर्माण करावी.