‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच !
By admin | Published: April 13, 2016 03:51 AM2016-04-13T03:51:34+5:302016-04-13T03:51:34+5:30
पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना
मुंबई : पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना आणि दूरदृष्टीचा अभाव आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेला देवनार कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याची मागणीही त्यांनी केली.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच मंगळवारी राहुल गांधी यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन या ‘ज्वलंत’ प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राहुल येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांसह रहिवाशांची गर्दी झाली होती.
सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी तेथील रहिवाशांना आत जाण्यास मज्जाव केल्याने त्यांचा हिरमोड झाला. नागरिकांशी संवाद साधता न आल्याची खंत राहुल यांनीही बोलून दाखवली.
या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आमदार वर्षा गायकवाड, माजी
आमदार कृपाशंकर सिंग, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चंद्रकांत हंडोरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देवनार डम्पिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. चेंबूर सिटीझन संस्थेचे
२ पदाधिकारी मला भेटले. देवनारचा प्रश्न मांडताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. येथील धुरामुळे एका लहानग्याला जीव गमवावा लागला, हे वाईट आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांना हे दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने हे डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविले पाहिजे. - राहुल गांधी
मास्कविनाच डम्पिंगची पाहणी : देवनार डम्पिंग भेटीवेळी कोणालाही येथील दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून उपस्थित प्रत्येकाला तोंडाला लावण्यास मास्क देण्यात आले. पोलिसांसह पालिकेचे कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी तोंडाला मास्क लावूनही घेतले. परंतु अगदी साध्या वेशात म्हणजे निळी जीन्स आणि पांढऱ्या सदऱ्यात दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मास्कविना डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली.
छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्र
सराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. बड्या उद्योजकांसाठी सरकार छोट्या सराफांसह कारागिरांनी चिरडू पाहत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.