सुलेखनातून रेखाटला स्वच्छ भारत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2015 03:17 AM2015-10-17T03:17:31+5:302015-10-17T03:17:31+5:30
गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई
बनारस : गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा श्लोक म्हणत अक्षरलेखन करत होते. सूर्योदयाच्या साक्षीने जमलेले भाविक घाटावर रंगलेली अक्षर दंगल स्तीमित होऊन पाहत होते. बनारस विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘कलाक्षर’ या कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी संमेलनाचा रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला.
पालव-देसाई जोडीच्या अक्षरलेखन आणि टायपोग्राफीचा अनोखा सामना १०० फूट लांबीच्या कागदावर रंगला. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, शिक्षीत भारत’ असा संदेश त्यातून देण्यात आला.
हे सारे चालू असताना सभोवताली जमलेले भाविक सूर्याचे मंत्र आणि आरती चढ्या आवाजात म्हणत होते. सूर्य जसजसा वर येऊ लागला, तसतशी अक्षरेदेखील खुलून दिसू लागली. या अनोख्या मैफिलीनंतर अच्युत पालव यांचा ‘बनारस सुबह’ या संस्थेतर्फे मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला.
कॉम्प्युटरच्या जगात अक्षरलेखनाकडे जगाचा ओढा निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. पॅरिस येथेदेखील एका नामवंत कंपनीने इंटिरियर करण्यासाठी जगातल्या सात लिपींची निवड केली आहे, ज्यात आपल्या देवनागरीचा समावेश आहे आणि त्यासाठीदेखील आपण केलेल्या कामाची निवड होणे हा अक्षरलेखनाचा सन्मान आहे.
- अच्युत पालव, सुलेखनकार