स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘अधुरेच’

By admin | Published: March 5, 2016 02:15 AM2016-03-05T02:15:17+5:302016-03-05T02:15:17+5:30

पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे.

Clean Maharashtra campaign 'Apurech' | स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘अधुरेच’

स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘अधुरेच’

Next

नामदेव मोरे,  नवी मुबई
पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान अभियान राबविणे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह पालिकेच्या प्रत्येक सभेत कामाचा आढावा सादर केला जात नाही.
राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून पनवेलची ओळख आहे. परंतु पहिले हागणदारीमुक्त शहर बनविण्यास येथील प्रशासनास अपयश आले आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीमध्ये शहरात फक्त ५१ ठिकाणी शौचालये उभारण्यात आली आहेत. केंद्र शासनाने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये शहरात ४३,४४६ घरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील ३७,६५३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय आहे. ४,८१३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नाही. या अहवालाप्रमाणे ३,९१७ कुटुुंबातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असून, १,१२७ घरातील नागरिकांना अद्याप उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पालिकेच्या २०१४च्या शहर स्वच्छता आराखड्याप्रमाणे ४०,९७७ घरांमध्ये शौचालय असून ४,३१० घरांमध्ये ही सुविधा नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक नगरपालिकेने सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणी व देखभाल याकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. यामुळे शहराची लोकसंख्या १ लाख ८० हजार झाल्यानंतर व या ठिकाणी रोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असताना त्यांच्यासाठी पुरेशी प्रसाधनगृह उभारण्यात अपयश आले आहे. मार्केट, बसस्टॉप व इतर महत्त्वाच्या ठिकाणीही नागरिकांसाठी ही सुविधा नाही. शहरात झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची संख्या ९ हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय बेघर नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून या सर्वांसाठी फक्त ३६१ सीट्सच उपलब्ध आहेत. ३,९१७ कुटुंबांतील सदस्य सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असल्याचा दावा केला आहे. परंतू वास्तवात हा आकडा योग्य नसल्याचे बोलले जात आहे. शहरात पालिकेने बांधलेल्या अनेक शौचालयांची अवस्था बिकट आहे. शिवाजी चौकामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये पुरुषांचा वावर असल्याचे अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे. पालिकेतील राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते शिवदास कांबळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना या विषयाकडे लक्ष वेधले होते.
३० ठिकाणी शौचालये !
नगरपालिकेने शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. या अभियानाअंतर्गत जवळपास ३० ठिकाणी शौचालये बांधली जाणार आहेत. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. परंतु या अभियानामध्ये फक्त शौचालय उभारणे अभिप्रेत नाही. घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यावरही लक्ष देण्याच्या सूचना आहेत.
स्वच्छतादूतांचा वापर करणे
सिन्नरमधील सुवर्णा लोखंडे, वाशीममधील संगीता आव्हाडे व यवतमाळमधील चैताली राठोड या महिलांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शौचालय उभारल्यामुळे शासनाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून घोषित केले आहे. नगरपालिकेने जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये या स्वच्छतादूतांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु या सूचनांचेही योग्यपद्धतीने पालन केले जात नाही.
नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये नाहीत. जी आहेत त्यांची स्थितीही बिकट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानामधील अनेक सूचनांचे पालन केले जात नाही. शहरात स्वच्छतादूतांची घोषणाही केली जात नाही. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी योग्य त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असावे व त्याच्या देखभालीची यंत्रणा निर्माण करावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. -शिवदास कांबळे, गटनेते व शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी
> अभियानासाठी
शासनाच्या सूचना
प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान मोहीम राबविण्यात यावी.
अभियानात सहभागी झालेले नगरसेवक, नागरिक, संस्था यांची नोंद ठेवण्यात यावी
श्रमदान मोहिमेची छायाचित्र काढण्यात यावीत.
पालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत अभियानाच्या कामाचा
आढावा सादर करावा.
श्रमदानामध्ये सहभागी नागरिक व त्यांनी केलेल्या कामांच्या तपशिलाची नोंद ठेवावी.
शहरातील ओल्या - सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.

Web Title: Clean Maharashtra campaign 'Apurech'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.