स्वच्छ सिंधुदुर्गचा पॅटर्न राज्यभर राबविणार
By admin | Published: September 9, 2016 11:52 PM2016-09-09T23:52:11+5:302016-09-10T00:10:00+5:30
विनोद तावडे यांची माहिती : सर्व प्राथमिक शाळा ई प्रणालीने जोडणार
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांनाही स्वच्छता अभियानात प्रेरणादायी ठरणारा स्वच्छतेचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार आणि महाराष्ट्र स्वच्छतेत अव्वल बनविणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
देवगड दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोगटे कुटुुंबीयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे, अभिषेक गोगटे, आदी उपस्थित होते.
पत्रकाराशी संवाद साधताना तावडे यांनी इ-लर्निंग ही संकल्पना राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार असून, प्रत्येक शाळा संगणक प्रणालीने जोडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये ही संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पदे भरताना कोकणला प्राधान्य
२००९ नंतर नवीन शाळांना अनुदान देण्यात येणार नाही. त्यांना विनाअनुदानीत तत्त्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. गटशिक्षणाधिकारी पदे भरताना कोकणाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ७८ पदे दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
दोन वर्षांनी महामार्ग सुस्थितीत असेल
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. भूसंपादनाचे ८० टक्के काम झाले असून, आॅक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. यावर्षी खड्डेमय झालेल्या महामार्गावर उपाययोजना केल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. दोन वर्षांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत असेल, असे तावडे यांनी सांगीतले.
२0 पटसंख्येचा निर्णय डोंगराळ भागासाठी नाही
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना यापुढे गावातील मुख्य शाळांशी जोडण्यात येणार आहे. मात्र, डोंगराळ भागातील व मुलींच्या शाळांना यामधून वगळण्यात आले आहे. सामूहिक शिक्षण या संकल्पनेतून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना मुख्य शाळांमध्ये आणण्यात येणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.