एसटी स्वच्छ करा!
By admin | Published: January 8, 2015 02:03 AM2015-01-08T02:03:36+5:302015-01-08T02:03:36+5:30
राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके व बसगाड्यांमध्ये स्वच्छता राखा, असा आदेश परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी संबंधीत अधिका-यांना दिला.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके व बसगाड्यांमध्ये स्वच्छता राखा, असा आदेश परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी संबंधीत अधिका-यांना दिला.
राज्यमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत मंत्रालयात परिवहन विभागाचे सादरीकरण झाले. राज्यातील बहुतांश बसस्थानकांवर घाणीचे साम्राज्य आहे. बसगाड्यांमध्येही अस्वच्छता असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महामंडळाने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. विश्रांतीगृहांमध्ये वीज, पाणी, शौचालय, खाटा आदी पुरेशा सुविधा नाहीत. त्याचा वाहन चालक आणि वाहकांच्या कार्यक्षमतेवर तसेच मानसिकतेवर परिणाम होतो. विश्रांतीगृहांमध्ये पुरेशा सुविधा देतानाच महिला वाहक व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र आणि पुरेशा सुविधांसह विश्रांतीगृहे असावीत, असेही राज्यमंत्र्यानी सूचविले. एसटीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहेत. लोकांचा एसटीकडे ओघ वाढल्यास महामंडळ निश्चित फायद्यात राहू शकेल. यादृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी राज्यशासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)