नाल्यात जेसीबी उतरवून सफाई सुरू
By admin | Published: June 9, 2017 03:29 AM2017-06-09T03:29:24+5:302017-06-09T03:29:24+5:30
नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणीदौऱ्यात उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत केडीएमसीतर्फे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणीदौऱ्यात उघडकीस आला. यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना तंबी देत कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले होते. अखेर, या तंबीनंतर प्रशासन कामाला लागले असून थेट नाल्यात जेसीबी उतरवून सफाईची कामे करण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अशा तीन टप्प्यांत नालेसफाईची कामे केली जातात. सध्या महापालिका हद्दीतील नाल्यांची संख्या ८९ च्या आसपास आहे. या नाल्यांच्या सफाईसाठी यंदा ३ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु, ही कामे पूर्ण झालेली नसल्याचे बुधवारच्या महापौरांच्या दौऱ्यात आढळले.
महापौरांनी या दौऱ्यात कल्याण शहरातील आधारवाडी, संतोषीमाता मंदिर रोड, जरीमरी, कोळसेवाडी, खडेगोळवली इत्यादी नाल्यांची पाहणी केली. या वेळी जरीमरी नाल्यात अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. खडेगोळवली नाल्याच्या ठिकाणी नाल्यातील गाळ कंत्राटदाराने काठावरच ठेवल्याचे दिसले. नालेसफाईची ही अपूर्णावस्थेतील कामे पाहता महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुख्यालयाची वाट धरण्याची नामुश्की ओढवली होती.
विरोधकांची जोरदार टीका
महापौरांच्याच दौऱ्यात नालेसफाईच्या कामांमधील फोलपणा उघड झाल्याने विरोधकांनीही प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर खरपूस टीका करण्याची संधी सोडली नाही.
चौफेर झालेल्या टीकेनंतर प्रशासनाच्या नालेसफाईने वेग घेतला आहे. खडेगोळवली नाल्यात गुरुवारी जेसीबी उतरवून नालेसफाई सुरू होती. या कामांमध्ये सातत्य राहावे, अशी अपेक्षा कल्याण-डोंबिवलीकरांकडून व्यक्त होत आहे.