मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई
By admin | Published: July 19, 2016 03:04 AM2016-07-19T03:04:44+5:302016-07-19T03:04:44+5:30
कळंबोली वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडपाणी येत होते.
कळंबोली : कळंबोली वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडपाणी येत होते. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. सिडकोकडे असलेल्या मलनिस्सारण पंपाने योग्यरीत्या साफसफाई होत नसल्याने ही समस्या गंभीर बनत चालली होती. परंतु सिडकोने या वाहिन्या साफ करण्याकरिता इटालीयन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या हाय फ्लो डिसिल्टिंग पंपाचा वापर सुरू केला आहे. त्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई सुरू आहे. यामुळे मलमिश्रित पाण्याचा अडथळा दूर होण्यास सुरुवात झाली आहे.
कळंबोली विकसित करताना सिडकोने कोणत्याही तांत्रिक बाबी तपासल्या नाहीत. त्याचबरोबर योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे ही वसाहत साडेतीन मीटर खाली वसविण्यात आली. त्यामुळे भरतीचे पाणी खाडीव्दारे अनेकदा शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांव्दारे शहरात येत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होत नसल्याने कमी पावसातही सिडकोच्या घरात पाणी शिरते. २६ जुलै २००५ रोजी कळंबोलीची अतिशय बिकट अवस्था झाली होती. वसाहतीत जे सर्वात आगोदर विकसित झालेले सेक्टर हे खाली आहेत आणि मलनिस्सारण केंद्र तसेच पंपिंग हाऊस उंचावर असल्याने या सेक्टरमधील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावता येत नाही. सिंग हॉस्पिटलसमोर होल्डिंग पाँडलगत पंपिंग करण्याकरिता पंप बसविण्यात आले आहेत. चोवीस तास पंपिंग करून वसाहतीतील सांडपाणी खेचावे लागते. त्याकरिता महिन्याला लाखो रुपये खर्च सिडकोला करावा लागतो, तरी सुध्दा वाहिन्या सातत्याने तुंबल्या जात होत्या. त्याचबरोबर चेंबरमध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी वाहताना दिसत असे.
सेक्टर ८ आणि ११ या दरम्यान एसबीआय, आयडीबीआय बँकांसमोरील चौकात तर सातत्याने चेंबरमधून मलमिश्रित पाण्याची गळती सुरू असायची. याचा त्रास आजूबाजूच्या बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी, इमारतीतील रहिवासी, पादचारी, वाहन चालकांना होत असे. तसेच नाकाबंदी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. त्यानुसार सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे, कार्यकारी अभियंता सुनील कापसे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंपिंग करून मलनिस्सार वाहिन्यांची सफाई करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला. त्यानुसार गेल्या दिवसापासून हाय फ्लो डिसिल्टिंग पंपाद्वारे सफाईचे काम सुरू असल्याचे कापसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>नियोजन चुकले
पंपाव्दारे १५० केजी प्रेशरने पाणी आतमध्ये ढकले जाते. त्याचबरोबर पॉवरफुल व्हॅक्युम पोकळी निर्माण करून त्याव्दारे माती, पाणी, वीट गोणी, फर्शी तुकडे, बाटल्या वैगरे खेचले जाते. कळंबोलीत ३० मीटर रुंदीच्या ११ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्यांची सफाई गेल्या १५ वर्षांपासून झाली नव्हती. मनुष्य आतमध्ये न उतरवता ३० फुटांपर्यंतचा चेंबर साफ करता येतो. २५ तासांकरिता २ लाख ९९ हजार रुपये अदा केले असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. चेंबरमधून वाहिन्या अतिशय व्यवस्थित चांगल्या पध्दतीने साफ करता येतात. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
चेंबरमध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी वाहत होते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यात येत आहे.
मलनिस्सारण वाहिन्या बऱ्याच ठिकाणी तुंबल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या सगळ्या वाहिन्या हायटेक पंपाच्या माध्यमातून आम्ही साफ करीत आहोत. वाहिन्यांमध्ये अडकलेली माती, दगड, गोण इतर साहित्य बाहेर काढून सांडपाण्याला वाट करून दिली जात आहे. कळंबोलीकरांची त्रासातून मुक्तता करणे हेच सिडकोचे ध्येय आहे
- सुनील कापसे, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली