सफाई कामगार संपावर जाणार
By admin | Published: April 7, 2017 02:02 AM2017-04-07T02:02:02+5:302017-04-07T02:02:02+5:30
सफाई कामगारांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने १८ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने रस्ते सफाईसाठी आणलेल्या यांत्रिक झाडूला विरोध करत सफाई कामगारांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने १८ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे देशाच्या आर्थिक राजधानीतच तीनतेरा वाजतील, अशी प्रतिक्रिया युनियनचे अध्यक्ष अॅड. सुखदेव काशिद यांनी व्यक्त केली आहे.
यांत्रिक झाडूसह अन्य मागण्यांसाठी सफाई कामगारांनी गुरुवारी आझाद मैदानात इशारा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो महिला व पुरुष सफाई कामगारांनी हजेरी लावली. महापालिकेच्या यांत्रिक झाडूच्या प्रकल्पाविरोधात युनियन १३ एप्रिलपर्यंत वॉर्डनिहाय आंदोलन करणार आहे.
त्यानंतरही हा प्रकल्प रद्द केला नाही, तर १८ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसणार असल्याचे काशिद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुंबईत निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांना महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही काशिद यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन खात्यात एकूण ३१ हजार ७६५ कामगार काम करत असून दत्तकवस्ती, मॅनिंग मॅपिंग, हैदराबाद पॅटर्न, एनजीओ अशा पद्धतीने १५ हजार कंत्राटी कामगार काम करत आहेत. प्रशासनाच्या एरिया बेस कंत्राटी पद्धतीमुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती संघटनेचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्या
सफाई कामगारांची सेवानिवासस्थाने दुरुस्त करणे किंवा त्याच ठिकाणी त्यांची पुनर्बांधणी करणे किंवा मालकी हक्काने घरे देणे.
२००५ सालापासून ४० हजार कामगार कालबद्ध पदोन्नतीसाठी पात्र झाले असून त्यातील फक्त १० हजार ७४२ कामगारांना कालबद्ध पदोन्नती मिळाली आहे. परिणामी, कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने द्यावी. वारसाहक्क प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. सर्व चौक्यांवर शौचालये, स्नानगृह, लॉकर्स, महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या अशा सुविधा उपलब्ध करून द्या.