स्वच्छता दूताच्या सासूलाच उघड्यावर शौचास जाताना पकडले
By admin | Published: December 26, 2015 02:38 AM2015-12-26T02:38:01+5:302015-12-26T02:38:01+5:30
वाशिम येथील प्रकार; गुडमॉर्निंग पथकाची कारवाई.
वाशिम : शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकल्याने प्रकाशझोतात आलेल्या, राज्याच्या स्वच्छता दूत संगीता आव्हाळे यांच्या सासूला उघड्यावर शौचास जाताना गुडमॉर्निंग पथकाने शुक्रवारी पकडले. मंगरूळपीर तालुक्यातील सायखेड येथील संगीता आव्हाळे यांनी मंगळसूत्र विकून घरात शौचालय बांधले. त्यांच्या या कार्याची दखल घेत, शासनाने त्यांचा राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून गौरव केला. शौचालयाचे महत्व राज्यभर पसरविण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्या खांद्यावर टाकली. दरम्यान, उघड्यावर शौचास जाणार्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित केले असून, हे पथक गावोगावी धाड टाकत आहे. २५ डिसेंबर रोजी गुडमॉर्निंग पथकाने सायखेडा येथे धाड टाकली असता, यावेळी संगीता आव्हाळे यांच्या सासूला पकडण्यात आले. गुडमॉर्निंग पथकातील सदस्यांनी त्यांना उघड्यावर शौचास जाणे चुकीचे असल्याचे सांगितले. तुमच्या सूनच राज्याच्या स्वच्छता दूत असताना, तुम्हीच शौचालयाचा वापर न करणे चुकीचे असल्याची समजही त्यांना दिली. संगीता आव्हाळे माहेरी गेल्या असल्यामुळे त्यांची या मुद्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र तिचे पती नारायण आव्हाळे यांनी मात्र घरी सहा-सात सदस्य आहेत. शौचालयात बाबा गेल्यामुळे, आईला बाहेर जावे लागले असल्याची त्यांनी सारवासारव केली.