स्वच्छतेची मोहीम घरापासून करा
By admin | Published: February 5, 2017 11:48 PM2017-02-05T23:48:00+5:302017-02-05T23:48:00+5:30
भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़
सोलापूर : भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़ त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करा, मग सार्वजनिक जीवनात स्वच्छ राहण्याची भाषा शोभून दिसेल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.
सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना खा़ चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर चौफेर टीका केली़ मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकासावर होणारे परिणाम, नोटाबंदीने जनतेची झालेली हालअपेष्ठा, अर्थव्यवस्थेवरील परिणाम आदी विषयांवर प्रकाश टाकला़ भाजपा-सेनेच्या भांडणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यात एकत्र काम करतात, यापूर्वी कोणत्याच सेनेच्या मंत्र्यांनी विरोध दर्शविला नाही़ आता नेमके निवडणुकीत भाजपाकडून औकात दाखवण्याची भाषा केली जाते आणि सेना निमूटपणे ऐकून घेते, हा सारा प्रकार जनतेची फसवणूक करण्यासाठी आहे़
सरकारच्या अपयशाचे खापर निवडणुकीत आपल्यावर फुटू नये यासाठी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध खेळी आहे़ यामुळे काँग्रेसला राजकारणात ‘स्पेस’ मिळू नये, झाला फायदा तर भाजपाचा अथवा सेनेचा व्हावा ही त्यामागची रणनीती आहे़ निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रच येणार आहेत़ खा़ किरीट सोमय्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़