‘प्रवाशांच्या सेवे’साठी स्वच्छता मोहीम
By admin | Published: May 2, 2016 01:06 AM2016-05-02T01:06:35+5:302016-05-02T01:06:35+5:30
स्वच्छतेअभावी अनेक प्रवासी दुरावले जात असल्याने त्या भीतीपोटी एसटी महामंडळाने राज्यातील आगार, बस स्थानके, प्रसधानगृहांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : स्वच्छतेअभावी अनेक प्रवासी दुरावले जात असल्याने त्या भीतीपोटी एसटी महामंडळाने राज्यातील आगार, बस स्थानके, प्रसधानगृहांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ मेपासून ‘स्वच्छता मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. एसटी बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचे काम हे खाजगी संस्थांकडे आहे. त्याची स्वच्छता समाधानकारक न झाल्यास खाजगी संस्थांवर कारवाई करण्याचा इशाराही एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाचे राज्यात २५0 आगार, ५६८ बस स्थानके आहेत. प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित प्रवासाबरोबरच स्वच्छ बस स्थानके उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख कर्तव्य आहे. मात्र स्वच्छतेअभावी अनेक प्रवासी एसटीपासून दुरावत असल्याचे एसटी महामंडळाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकातून सांगण्यात आले आहे. एसटीचे प्रवासी दुरावले जाऊ नयेत यासाठी महामंडळाने प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बस स्थानके व आगार देण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानक, आगारांबरोबरच प्रसाधनगृहे, बस स्थानकांवरील वाहनतळ, चालक-वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहे स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे.
बस स्थानकांवरील प्रसानधनगृहे आणि त्यांची स्वच्छता हा प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या साफसफाईबाबत महामंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेबाबत काही सूचना केल्या आहेत. एसटी बस स्थानकांवरील बहुुतांश प्रसाधनगृहांची स्वच्छता परवानाधारक खाजगी संस्थांकडे आहे. ज्या संस्थांकडून समाधानकारक सफाईचे काम होत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या व स्वच्छता समाधानकारक करवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी आगारप्रमुख आणि आगार व्यवस्थापकांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत दर दोन तासांनी प्रसाधनगृहे आणि बस स्थानकांची पाहणी करून त्याची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्व कर्मचारी-कामगार आणि अधिकाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. शिवाय जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या सात महिन्यांतील महागाई भत्त्याची थकबाकी
मे २०१६च्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता ११३ टक्क्यांहून ११९ टक्के इतका होईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अभ्यासपूर्ण सुधारणा करण्यासाठी भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक डी. आर. परिहार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय वेतनसुधार समिती नेमण्यात येणार आहे.
250 आगार, ५६८ बस स्थानके आहेत. प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित प्रवासाबरोबरच स्वच्छ बस स्थानके उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख कर्तव्य आहे.
एसटीच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांबरोबरच त्या विभागातील स्वयंसेवी संस्था, समाजसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
बस स्थानकावरील उपाहारगृहे, स्नॅक्सबार, चहा-कॉफी, फळांची दुकाने स्वच्छ ठेवण्यात येतील.
महामार्गावर जेथे
अल्प विश्रांतीसाठी
एसटी बसेस थांबतील
तेथील उपाहारगृहे व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.