सरकारी कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात
By admin | Published: May 19, 2016 03:04 AM2016-05-19T03:04:16+5:302016-05-19T03:04:16+5:30
स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे
अलिबाग : स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.
स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात आपल्याच जिल्हा परिषदेपासून करण्यासाठी बुधवारी स्वच्छतेची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात याबाबतचा कार्यक्रम पार पडला. साळुंखे यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीमध्ये सर्व सरकारी इमारत, कार्यालये स्वच्छ करण्यात येणार आहेत. २३ मे रोजी सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिकपणे स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे. २५ मेला अधिकारी आणि कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायचा आहे, तर २६ मे रोजी सरकारी कार्यालयातील कागदपत्रांची नोंदणी करून ते व्यवस्थित ठेवून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावायची आहे. त्याचप्रमाणे २७ मेला सरकारी इमारत व इमारतीच्या परिसराची स्वच्छता करायची आहे. ३० मे रोजी सर्व कार्यालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच पाण्याची बचत करून अन्य लोकांनाही बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले.
कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध उपाय सुचविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता मिशनचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी ए.के.जाधव, नंदकुमार गायकर, रविकिरण गायकवाड, नेहा जाधव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.