कोल्हापूर अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता : नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

By Admin | Published: September 22, 2014 11:30 PM2014-09-22T23:30:58+5:302014-09-23T00:00:51+5:30

मंदिर सुरक्षेची पाहणी विशेष पोलीस महानिरीक्षक : मोठा बंदोबस्त तैनात करणार

Cleanliness of Kolhapur Ambabai's ornaments: Navaratri festival preparation speed | कोल्हापूर अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता : नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

कोल्हापूर अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता : नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

googlenewsNext

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानदंड, मोरपक्षी, चंद्रहार, पुतळाहार, ठुशी, बोरमाळ, म्हाळुंग, पुतळ्याची माळ, सोन्याची गदा अशा करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या प्राचीन नित्यालंकार व उत्सवालंकारांची आज, सोमवारी स्वच्छता करण्यात आली. देवस्थान समितीच्या जवळ असणाऱ्या कार्यालयात सकाळी साडेदहाला दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. प्रारंभी देवीच्या अलंकारांचे नित्यालंकार म्हणजे रोज घातल्या जाणाऱ्या अलंकारांची स्वच्छता प्रथम करण्यात आली. त्यानंतर उत्सवालंकार म्हणजे खास सणावेळी घातल्या जाणाऱ्या विशेष अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये माणिक हार, चौरीमोरचेल, कर्णफुले, जडावाचा किरीट, सर, नथ, चिंचपेटी, मोत्याचा हार, श्री यंत्र हार, चंद्रकोरहार, चाफेकळी, साज, मोहनमाळ, सोन्याचे गजरे, पाचपदरी कंठी, सोळापदरी माळ, पाचपदरी माळ, देवीच्या उत्सवमूर्तीचे दागिने अशा सर्व प्रकारच्या सुवर्ण अलंकारांची आज स्वच्छता
करण्यात आली. दागिन्यांच्या रखवालीचा मान असलेले महेश खांडेकर हे
यावेळी उपस्थित होते, तर संतोष निटणकर, शैलेश इंगवले, महेश कडणे, उमेश लाड, योगेश गवळी, दिनेश सावंत, संतोष नेतलकर या कारागिरांनी दागिने स्वच्छ केले. (प्रतिनिधी)

पोलीस नियंत्रण मंडप ठाण्याच्या आवारात
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ हायस्कूल दरवाजासमोर दरवर्षीप्रमाणे उभारण्यात येणारा मंडप यंदा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात उभा करण्यात आला आहे. यापूर्वीच्या ठिकाणी मंडप उभारणी केल्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

मंदिर सुरक्षेची पाहणी
विशेष पोलीस महानिरीक्षक : मोठा बंदोबस्त तैनात करणार
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा हे होते.
नवरात्रोत्सवानिमित्त राज्य व देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. या दरम्यान त्यांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचू नये, याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचबरोबर गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरेही उभे करण्यात आले आहेत. या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी केली. यावेळी त्यांनी ज्या ठिकाणी अधिक गर्दी होते, त्या ठिकाणांचा आढावा घेतला. मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना पोलीस प्रशासनाला त्यांनी दिली. याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनरांग, मंदिरातील आतील रांग, भाविकांचा येण्या-जाण्याचा मार्ग याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा, वाहतूक पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पार्किंगची पाहणी
भवानी मंडप परिसरात होणारे पार्किंग अन्यत्र हलवण्याच्या दृष्टीने मेन राजाराम हायस्कूल पाठीमागील बाजूस असणारे केबीन, पूर्वीचा केएमटी थांबा, मोकळे बसस्थानकाचे पिकअपशेड, विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल यांचे चित्रीकरण स्वत: जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी आपल्या मोबाईलद्वारे केले. एका केबीनसमोर शर्मा आले असता केबीनधारकाने त्यांच्यापुढे घरफाळा भरल्याची पावती दाखविली.
पार्किंगची पाहणी

मंदिर परिसरातील अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी स्वत:हून हटवली
नवरात्रौत्सवामध्ये अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विनाअडथळा सुलभ दर्शन व्हावे, याकरिता कोल्हापूर महापालिका अतिक्रमण विभाग आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांनी परिसरातील फेरीवाले व फुले व्यापाऱ्यांनी आपली अतिक्रमणे हटवून घेण्याची विनंती केली होती. त्यास मान देऊन व्यापाऱ्यांनी स्वत:हून अडथळा होणारी अतिक्रमणे सोमवारी काढून घेतली.
महाद्वार दरवाजा ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरात रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तू, फळे, भाजी आदी विकणाऱ्या फेरीवाले यांनी आपण या परिसरामध्ये अडथळा होईल, असे वर्तन व कोणत्याही साहित्याची विक्री करणार नाही. त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध व्यापार न करता रस्त्याकडेला व्यापार करणार, अशी ग्वाही महापालिका अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाला दिली.

Web Title: Cleanliness of Kolhapur Ambabai's ornaments: Navaratri festival preparation speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.