‘स्वच्छता’ पॅटर्न राज्यात राबविणार

By admin | Published: November 19, 2015 02:20 AM2015-11-19T02:20:46+5:302015-11-19T02:20:46+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा नगरपालिकांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले असून, स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आता राज्यातील जवळपास

'Cleanliness' pattern will be implemented in the state | ‘स्वच्छता’ पॅटर्न राज्यात राबविणार

‘स्वच्छता’ पॅटर्न राज्यात राबविणार

Next

- यदु जोशी,  मुंबई
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा नगरपालिकांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले असून, स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आता राज्यातील जवळपास तीनशे नगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), लोणावळा, शिरुर (पुणे), सांगोला (सोलापूर), देवळाली प्रवरा (अहमदनगर) आणि उमरेड (नागपूर) या सहा नगरपालिकांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांना लवकरच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागाच्या प्रधान सचिव मीता राजीवलोचन यांनी ‘लोकमत’ला दिली. दारोदारी कचरा संकलनाचे प्रमाण, घरोघरी ओला व सुका कचऱ्याचे होत असलेले विलगीकरण, प्लॅस्टिक बंदी (५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या) आणि हागणदारीमुक्तीची स्थिती या चार निकषांचे पालन कितपत केले आहे, या बाबतची माहिती नगरपालिका प्रशासनाने मागविली होती. २४ नगरपालिकांनी तसा दावा केला. मात्र, निकषांनुसार ९ नगरपालिका प्रशासनाकडून पाहणीसाठी निवडण्यात आल्या. नाशिक विभागीय आयुक्तालयातील प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या नऊही नगरपालिकांची पाहणी करून त्यातील ६ नगरपालिकांची निवड केली. समितीने काल आपला अहवाल सादर केला. या नगरपालिकांमधील स्वच्छता उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. दर तीन महिन्यांनी ३० नगरपालिका ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाखाली आणल्या जातील, अशी माहिती मीता राजीवलोचन यांनी दिली.

मालमत्ता करासाठी होणार सॅटेलाइट सर्वेक्षण
राज्याच्या नगरपालिकांमधील जवळपास ३० टक्के संपत्तीवर मालमत्ता करच लावला जात नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, आता या संपत्तीचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मीता राजीवलोचन यांनी सांगितले की, सॅटेलाइटने एकदा नगरपालिका क्षेत्रातील घरांबाबतचे नकाशे दिले की, एक एजन्सी प्रत्यक्ष पाहणी करून त्या घरांवरील मालमत्ता कर किती, ते नियमानुसार निश्चित करणार आहे.
त्यामुळे मालमत्ता कराच्या आकारणीतून आतापर्यंत वाचलेल्यांना तो भरावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १८० नगरपालिकांमध्ये असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

स्वच्छतेचे अनोखे उपक्रम
लोणावळामध्ये शालेय विद्यार्थी आपली शाळा, घर परिसरातील किती कचरा उचलून योग्य ठिकाणी टाकला, याचा हिशेब पासबुकात ठेवतात.
शिरुर नगरपालिकेने हागणदारीमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार केले आहे.
वेंगुर्ले नगरपालिकेत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करून, त्यावर पथदिव्यांसाठी वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सुक्या कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. शहरात गोळा झालेले प्लॅस्टिक प्रक्रिया करून रस्ते डांबरीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
सांगोलेमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना फुले देणे, त्यांचे फोटो काढणे, हे फोटो नगरपालिकेने तयार केलेल्या विशेष बॅनरमध्ये लावून प्रसिद्ध करणे, वरात काढणे असे विविध उपक्रम राबविले.
शहरातील कचरा एका ठिकाणी गोळा करण्याऐवजी, त्यावर आहे त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याची पद्धत देवळाली प्रवरा नगरपालिकेने अवलंबिली आहे.

Web Title: 'Cleanliness' pattern will be implemented in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.