पालखी मार्गावर वारी स्वच्छतेची...!
By Admin | Published: June 29, 2017 05:16 PM2017-06-29T17:16:32+5:302017-06-29T17:16:32+5:30
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तरडगावकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून मुक्कामादरम्यान सहभागी भाविकांची सेवा केली.
आॅनलाइन लोकमत
तरडगाव (सातारा), दि. 29 - श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तरडगावकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून मुक्कामादरम्यान सहभागी भाविकांची सेवा केली. पाऊस नसला तरी सोहळ्यानंतर रोगराई पसरू नये, याची दक्षता घेत पालखी मार्गावर वारी स्वच्छतेची राबविली जात आहे. त्याद्वारे पालखी तळाची स्वच्छता, मैलाची विल्हेवाट आणि जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.
दरवर्षी सोहळ्यानंतर मुक्काम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते. यंदा ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वाढीव स्वच्छतागृहे दिल्याने तसेच निर्मल वारीअंतर्गत भाविकांना उघड्यावर बसण्यासाठी अटकाव बसावा या उद्देशाने पहाटेच्या सुमारास काही पथके तैनात करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम झाला असून, परिसर बऱ्यापैकी स्वच्छ राहण्याचे पाहायला मिळत आहे.
माऊलींची वारी सध्या सोलापूर जिल्ह्यात असली तरी ज्या मार्गावरून पुढे गेली आहे, त्या भागात रोगराई पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव पालखी तळाची स्वच्छता पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थ्यानी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करून स्वछतेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी तळावरील बारीक-सारीक टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत पदाधिकारी, कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले. रोगराई बळाऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी जंतूनाशक पावडर टाकून औषध फवारणी देखील केली आहे. तरडगावसाठी सातशे स्वच्छतागृहे देण्यात आली होती. पालखी गेल्यानंतर मोठा खड्डा खोदून त्यात घाणीची विल्हेवाट लावण्यात आली.
निर्मल वारीअंतर्गत दिलेल्या जादा स्वच्छतागृहामुळे तसेच राबविलेल्या उपाय योजनांमुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारीनंतर होणाऱ्या अस्वच्छतेस चांगला आळा बसला. तरीही रोगराई पसरू नये यासाठी ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणी करून दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती उपसरपंच अमोल गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.