स्वच्छतेचे बीज मनात रुजावे!

By admin | Published: October 2, 2016 01:50 AM2016-10-02T01:50:38+5:302016-10-02T01:50:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना, महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण

Cleanliness seeds should be in the heart! | स्वच्छतेचे बीज मनात रुजावे!

स्वच्छतेचे बीज मनात रुजावे!

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना, महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर, या स्वच्छ भारत अभियानास देशव्यापी चळवळीचे रूप देण्यात आले. याच ‘स्वच्छ भारत अभियाना‘ला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. गांधी जयंतीनिमित्त आज देशभर स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून या अभियानाविषयी आणि स्वच्छतेविषयी मते घेतली. या वेळी मान्यवरांनी या अभियानाला पाठिंबा देत विविध पातळ््यांवर, संस्थांमध्ये आणि चिमुरड्यांच्या मनात स्वच्छतेचे बीज रोवले पाहिजे, असे विचार ‘लोकमत’शी बोलताना मांडले. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया...

शाळेतच व्हावे
स्वच्छतेचे संस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ स्वागतार्ह आहे. या अभियानाविषयी मेट्रो सिटींप्रमाणे ग्रामीण भागांतही जनजागृती झाली पाहिजे. देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांना स्वच्छता अभियानात सहभागी करून घेतले पाहिजे. लहानग्यांना शालेय दिनक्रमात स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, त्याचे मूल्यमापन करणे अशा गोष्टी केल्या पाहिजे. प्रत्येक शाळेने ‘बालस्वच्छतादूत’ ही संकल्पना राबविली पाहिजे.
- डॉ. विजया वाड,
ज्येष्ठ साहित्यिक

लोककलांतून व्हावा
स्वच्छतेचा जागर
‘स्वच्छ भारत अभियाना’साठी राज्यातील लोककलांच्या वैभवाचा वापर केला पाहिजे. ग्रामीण पातळीवर कानाकोपऱ्यांत भजन, भारुड, कीर्तन, गवळण अशा असंख्य प्रकारांतून स्वच्छतेची मूल्ये रुजतील.
- डॉ. गणेश चंदनशिवे,
लोककला अभ्यासक

अस्वच्छता म्हणजे मानसिक हिंसाच!
अनेक जण वस्तू, कागद अशा वस्तू इथे-तिथे टाकतात. सर्वत्र अस्वच्छता पसरवतात. ही अस्वच्छता मला मानसिक हिंसा वाटते. मनाचा अवकाश स्वच्छ राहिल्यास अनेक गोष्टींमध्ये स्वच्छता येऊ शकते.
- डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ

शारीरिक स्वच्छतेला
महत्त्व द्या!
शारीरिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. रोज आंघोळ केली पाहिजे. त्यामुळे त्वचेचे रोग सहज दूर ठेवता येतात. दातांची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. जेवण हे नेहमी स्वच्छ पाण्यात केले पाहिजे. पान,तंबाखू आणि गुटखासारख्या गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. नैसर्गिक विधी हे स्वच्छतागृहांमध्येच केले पाहिजेत.
- डॉ. जलील परकार,
श्वसनविकार तज्ज्ञ

स्वच्छता राखा साथीचे आजार टाळा!
अस्वच्छतेमुळेही साथीच्या आजारांना खतपाणी घातले जाते. यावर मात करण्यासाठी स्वच्छतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. या स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता व्हायला हवी. या स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. अविनाश सुपे,
संचालक, महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये

स्वच्छतेचा फायदा आपल्यालाच
आपण आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला, तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल. स्वच्छता राखल्यास घाणीचे साम्राज्य नष्ट होईल. वातावरण चांगले राहील व रोगराई पसरणार नाही. ही देशाची मोहीम आहे. सर्वांचा हातभार गरजेचा आहे.
- अनुप कुमार,
कर्णधार भारतीय कबड्डी संघ

Web Title: Cleanliness seeds should be in the heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.