व्हीआयपींच्या दारातच स्वच्छतेचे झाडू!
By admin | Published: April 3, 2015 02:22 AM2015-04-03T02:22:16+5:302015-04-03T02:22:16+5:30
तप्रधानांनी जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानानुसार स्वच्छतेची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली खरी़ मात्र स्वच्छतेचे हे झाडू २४ तास केवळ
मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानानुसार स्वच्छतेची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली खरी़ मात्र स्वच्छतेचे हे झाडू २४ तास केवळ व्हीआयपी विभागांमध्येच फिरत आहेत़ राज्यपाल, मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांचे निवासस्थान, विदेशी वकिलाती असलेल्या मार्गांवरच ही सेवा सुरू आहे़
परंतु दक्षिण मुंबईतील या १८ रस्त्यांच्या धर्तीवर संपूर्ण मुंबईतील रस्ते २४ तास स्वच्छ ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले़ मलबार हिल, मरिन ड्राइव्ह, हँगिंग गार्डन, भुलाभाई देसाई रोड, पेडर रोड, नेपीयन्सी रोड या व्हीआयपी मार्गांची २४ तास साफसफाई केली जाते. अशा १८ रस्त्यांच्या २४ तास सफाईसाठी पालिकेतर्फे जादा कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते़ या कामगारांचे कंत्राट जानेवारी महिन्यात संपल्यानंतर निविदा न मागविताच पुन्हा त्याच संस्थांना मार्च अखेरीपर्यंत काम देण्यात आले़ त्याचे ३४ लाखांचे बिल चुकते करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आणण्यात आला़ मात्र यावर सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला असून, उपनगरांकडे दुर्लक्ष का? असा जाब विचारला आहे़