सफाई कामगारांनी साजरा केला ‘विजय दिन’

By Admin | Published: May 2, 2017 04:22 AM2017-05-02T04:22:06+5:302017-05-02T04:22:06+5:30

मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे औद्योगिक लवादाचे

Cleanliness workers celebrate 'Vijay Din' | सफाई कामगारांनी साजरा केला ‘विजय दिन’

सफाई कामगारांनी साजरा केला ‘विजय दिन’

googlenewsNext

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे औद्योगिक लवादाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम राखले. कामगार संघटनेचा हा विजय महाराष्ट्र दिनी साजरा करण्यासाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगार सहकुटुंब सोमवारी आझाद मैदानावर जमले होते. या वेळी आणखी २ हजार ९४० कंत्राटी सफाई कामगारांना महापालिकेत कायम सेवेत घेण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे.
विजयी दिन साजरा करण्याआधी संघाचे सर्व नेते आणि कामगार हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी फोर्ट येथील हुतात्मा चौकात निघाले होते. मात्र कामगार आणि नेत्यांना पोलिसांनी हटकले. मोर्चा नव्हे, तर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी जात असल्याचे सांगून संघाने पोलिसांचा विरोध झुगारून लावला. या विजयी मेळाव्यात न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह या केंद्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. एन. वासुदेवन, कचरा वाहतूक श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव यांच्यासह कामगार नेते कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. विजय भट आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
याआधी २ हजार ७०० कामगारांना कायम सेवेत घेण्याची याचिका संघाने औद्योगिक लवादाकडे दाखल केली होती.
त्यात महापालिकेविरोधात निकाल देताना संबंधित कामगारांना
कायम सेवेत घेण्याचे आदेश लवादाने दिले होते. या आदेशाविरोधात
प्रथम उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात महापालिकेविरोधात संघटनेला यश मिळाले. या लढ्यातून नक्कीच
इतर कामगारांनाही प्रेरणा मिळेल, असे मत संघाचे सरचिटणीस कॉ. मिलिंद रानडे यांनी विजयी मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)

आणखी तीन विजय साजरे करू!
याआधी औद्योगिक लवादाने २००९ साली ५८०, २०१५ साली १ हजार ३०० आणि २०१६ साली १ हजार ६० अशा एकूण २ हजार ९४० कंत्राटी सफाई कामगारांसंदर्भात कायम सेवेत घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. संबंधित कामगारांना कायम सेवेत घेण्याऐवजी महापालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. २ हजार ७०० कामगारांबाबत मिळालेल्या निर्णयानंतर संबंधित कामगारांबाबतही लवकरच विजयी दिन साजरा करू, असेही संघाच्या नेत्यांनी सांगितले.

प्रक्रिया पूर्ण करा
कामगारांना कायम सेवेत घेण्यासाठी महापालिकेने कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचण्या तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन संघाने केले.

Web Title: Cleanliness workers celebrate 'Vijay Din'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.