सफाई कामगारच पुरस्काराचे खरे मानकरी
By Admin | Published: May 6, 2017 06:28 AM2017-05-06T06:28:10+5:302017-05-06T06:28:10+5:30
स्वच्छ भारत अभियानामध्ये महापालिकेला मिळालेल्या पुरस्काराचे खरे श्रेय सफाई कामगारांचे आहे. शहराचे खरे स्वच्छतादूत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये महापालिकेला मिळालेल्या पुरस्काराचे खरे श्रेय सफाई कामगारांचे आहे. शहराचे खरे स्वच्छतादूत असलेल्या या कामगारांना शिवसेनेने व नागरिकांनी पेढे वाटून पुरस्काराचा आनंद व्यक्त केला व प्रशस्तिपत्रक देऊन शहरवासीयांच्यावतीने आभार मानले.
केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई देशात ८ व्या व राज्यात पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले. याविषयी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी यामध्ये मोठा वाटा सफाई कामगारांचा आहे. याचे श्रेय त्यांना कोणीच देत नसल्याने शुक्रवारी कामगारांनी नेहमीप्रमाणे कामावर हजर होवून सफाईचे काम सुरू केले.
सीवूडमध्ये सफाईचे काम सुरू असताना शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी कामगारांना थांबविले. तुमच्यामुळे शहराला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे सर्व श्रेय तुमचेच असल्याचे सांगत प्रत्येकाला पेढे देवून आभार मानण्यात आले. याशिवाय प्रत्येक कामगाराला त्यांचे नाव टाकून प्रशस्तिपत्रही देण्यात आले. अचानक झालेल्या सत्कारामुळे कर्मचारीही भारावले होते.
या सत्कार सोहळ्याचे आयोजन शाखाप्रमुख समीर बागवान यांनी केले होते. कार्यक्रमास विभाग प्रमुख सुमित्र कडू व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित
होते.