दहावीच्या पोरानं अवघा सोशल मीडिया 'हिला डाला'; परीक्षा रद्द झाली म्हणून चंद्राचे फोटो खेचले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:43 AM2021-05-20T06:43:42+5:302021-05-20T09:20:19+5:30
काही लेख आणि यू ट्युबवर पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली. सोशल मीडियावर व्हायरल
पुणे : ‘ॲस्ट्रोफोटोग्राफी’चा छंद असलेल्या पुण्यातील सोळावर्षीय प्रथमेश जाजू याने चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी हे छायाचित्र असल्याचे सांगत, खगोलप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्पावधीतच हे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रभात रस्त्यावर वास्तव्यास असलेला प्रथमेश ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सदस्य आहे. तो म्हणाला, काही लेख आणि यू ट्युबवर पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली. मी चंद्राचे एकच छायाचित्र काढू शकलो असतो. पण त्याच्या ५० हजार इमेज काढल्या. जसा आपण मोबाइलमध्ये ‘पॅनोरमा’ काढतो, तसाच मी चंद्राचा पॅनोरमा काढला. चंद्राच्या छोट्या भागाला झूम करून त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर छोट्या-छोट्या भागांचे व्हिडीओ काढले, त्यातून छायाचित्रं मिळाली. एका व्हिडीओमधून तब्बल २००० छायाचित्रे मिळाली. या माध्यमातून जवळपास ३८ व्हिडीओ काढले.
मग एक व्हिडीओ घेऊन तो प्रोसेस केला. त्यातून एक छायाचित्र तयार केले. ३८ छायाचित्र काढल्यानंतर मग ती एकमेकांमध्ये मिक्स करत गेलो. सर्व इमेज जोडल्यानंतर एक छायाचित्र तयार केले. भारतात अजून तरी अशा पद्धतीने कुणी छायाचित्र काढले नसल्याचा दावाही त्याने केला.
ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करण्याची इच्छा
खगोलशास्त्राची विशेष आवड असल्याने ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉफिजिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे प्रथमेशने सांगितले.