दुष्काळग्रस्तांसाठी मौलवींचा पुढाकार

By admin | Published: October 4, 2015 04:04 AM2015-10-04T04:04:57+5:302015-10-04T04:04:57+5:30

मौलवींची संघटना व दोन मुस्लीम स्वयंसेवी संस्थांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल २७ लाख रुपये जमविले आहेत. बीड, लातूर व उस्मानाबाद

Cleric Initiatives for Drought Affected | दुष्काळग्रस्तांसाठी मौलवींचा पुढाकार

दुष्काळग्रस्तांसाठी मौलवींचा पुढाकार

Next

- जमीर काझी,  मुंबई
मौलवींची संघटना व दोन मुस्लीम स्वयंसेवी संस्थांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल २७ लाख रुपये जमविले आहेत. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील दोनशेहून अधिक गरजू शेतकऱ्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे. मुंबईतील विविध मशीद व मुस्लीम बांधवांकडून जमविलेल्या रकमेतील ७ लाख रुपयांचे वाटप शुक्रवारी करण्यात आले, तर उर्वरित निधी येत्या ५ आॅक्टोबरला जिल्ह्याच्या ठिकाणी देणार आहेत.
जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) व असोसिएशन्स आॅफ मुस्लीम प्रोफेशनल्स (एएमपी) या संस्थेच्यावतीने ईद-ऊल अज्हा (बकरी ईद) दिवशी नमाज पठणानंतर ही रक्कम दक्षिण मुंबईतील विविध मशिदींतून जमविण्यात आली, तर त्यासाठी स्वतंत्र बॅँक खातेही उघडण्यात आलेले होते. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्याप्रमाणेच
थेट गरजूंना मदत करण्याच्या उपक्रमातून सामाजिक दातृत्वाची वीण घट्ट झाली आहे.
या निधीपैकी ७ लाख रुपये इस्लाम जिमखान्यावर लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. प्रत्येकी २० हजारांचा धनादेश गरजूंना देण्यात आला. याबाबत बोलताना ‘सेवा’चे अध्यक्ष व माजी आमदार अ‍ॅड. युसूफ अब्राहनी म्हणाले, की राज्यात विशेषत: मराठवाड्यामध्ये यंदा भीषण दुष्काळ परिस्थिती उद्भविलेली आहे. शासकीय मदतीला मर्यादा असल्याने माणुसकीच्या नात्याने त्यांना साहाय्य करणे आपले कर्तव्य असल्याच्या भावनेतून मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याला समाजातील सर्व घटकांतील व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन आणि स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने गरजू शेतकऱ्यांची यादी बनविण्यात आली आहे. निधी जमविण्याचे काम सुरू राहणार असून, आवश्यकतेनुसार अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकाऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. मौलाना झहीर अब्बास रिझवी म्हणाले, की आपल्या बांधवांसाठी हा निधी कर्तव्य भावनेने जमविण्यात आलेला आहे. मौलाना शाहीद नसीरी म्हणाले, की दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्यांसाठी नमाज पठणानंतर विशेष प्रार्थना (दुवा) करण्याबरोबरच मशिदीतून मदत गोळा केली आहे. ‘एपीपी’चे अध्यक्ष अमीर इद्रसी म्हणाले, की संस्थेचे राज्यात २ हजारांवर सभासद असून, ते स्वत:च्या
खिशातून मदत देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळवित आहेत.
पहिल्या टप्प्यात तीन जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते जाऊन मदत देतील़ त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य भागातील शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल.

मदतीचा ओघ सुरूच...
शुक्रवारी काही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश देण्याच्या कार्यक्रमात हंडीवली मशिदीचे ईमाम मौलाना एजाझ काश्मिरी यांनी गरजू शेतकऱ्यांना आपल्या मशिदीतर्फे एक लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले. तर जागतिक मेमन फेडरेशनचे अध्यक्ष इक्बाल मेमन यांनी दुष्काळग्रस्त भागात विहिरीतून पाणी उपलब्ध करण्यासाठी पाइप व पंपपुरवठा करण्याचे, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांच्या लग्नकार्यात आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.

Web Title: Cleric Initiatives for Drought Affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.