चतुरस्र अभिनेत्री रि‘माँ’ काळाच्या पडद्याआड!

By admin | Published: May 19, 2017 06:02 AM2017-05-19T06:02:48+5:302017-05-19T06:02:48+5:30

सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Clever actress Rimon 'dark days! | चतुरस्र अभिनेत्री रि‘माँ’ काळाच्या पडद्याआड!

चतुरस्र अभिनेत्री रि‘माँ’ काळाच्या पडद्याआड!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी नाटक, तसेच मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी मृण्मयी, जावई विनय वायकुळ असा परिवार आहे.
बुधवारी रात्री छातीत दुखायला लागल्यानंतर, त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी, बरखा बिष्ट, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, प्रशांत दामले, रेणुका शहाणे, हर्षदा खानविलकर, शिल्पा तुळसकर, मोहन जोशी, नीना कुलकर्णी, निर्मिती सावंत, आमीर खान, त्याची पत्नी किरण राव, रजा मुराद आदी तारे-तारकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रीमा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. पूर्वाश्रमीच्या त्या नयन भडभडे! रंगभूमीचा वारसा त्यांना आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून लाभला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ या नावाने बालकलाकार म्हणून
त्यांनी कारकीर्दीला सुरुवात
केली.
‘पुरुष’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकांतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. ‘आई शपथ’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ अशा काही मराठी चित्रपटांतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’ आदी हिंदी चित्रपटांतील कसदार अभिनयातून ‘आई’च्या भूमिकेलाही त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले. ‘फिल्म फेअर’सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

...तो सन्मान अखेरचा ठरला
रीमा लागू मूळच्या पुण्याच्या. त्यानंतरच्या काळात त्या मुंबईतील गिरगाव येथील आंबेवाडीत स्थायिक झाल्या. १९८५च्या सुमारास त्यांनी गिरगाव सोडले आणि त्या अंधेरीत स्थायिक झाल्या. तरीही गिरगावशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अलीकडेच ‘कट्टर गिरगावकर’ या कार्यक्रमासाठी त्या गिरगावात आल्या होत्या. या कार्यक्रमात झालेला गौरव, हा त्यांचा अखेरचा सन्मान ठरला.

फिल्म फेअरने गौरव
‘मैने प्यार किया’, ‘आशिकी’ ‘हम आपके हैं कौन’ ‘वास्तव’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी रीमा लागू यांना ‘फिल्म फेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

रंगभूमी : ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘ पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘छापाकाटा’.

मालिका : ‘खांदान’, ‘श्रीमान-श्रीमती’, ‘तूतू-मेंमे’ं, ‘दो और दो पाच’, ‘धडकन’, ‘कडवी खट्टी मिठ्ठी’, ‘दो हंसो का जोडा’, ‘तुझ माझ जमेना’, ‘नामकरण’.

--------------------------------
रीमाने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांत नाव कमावले. तिचे हास्य अतिशय गोड होते. प्रेमळ आई म्हणून चित्रपटांत ती झपाट्याने वर आली. तिच्या बोलण्यात आपुलकी होती. प्रत्येक भूमिका
तिने प्रामाणिकपणे केली. तिचा अभिनय अभ्यासपूर्ण असायचा.
तिच्या जाण्याने एक गोड आई हरपली आहे.
- रमेश देव (ज्येष्ठ अभिनेते)

रीमा लागू या अप्रतिम अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी नाटक, मालिका, सिनेमा, हिंदी सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका सशक्तपणे पेलल्या. मला त्यांच्याबरोबर ‘आसू आणि हसू’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘स्वीट होम’, ‘घराबाहेर’ अशी नाटके आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या उत्तम अभिनेत्री होत्याच; मात्र, माणूस म्हणूनही खूप छान होत्या. त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा यायची. त्यांनी कधीही मोठेपणा मिरवला नाही. त्यांच्याबरोबर भूमिका साकारताना सहजता जाणवायची. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
- मोहन जोशी (ज्येष्ठ अभिनेते)

मी रीमाचा प्रवास जवळून पाहिला आहे. ती अतिशय मनस्वी अभिनेत्री होती. १९८५ मधील ‘अनकही’ चित्रपटापासून आम्ही एकत्र काम केले. ‘धूसर’ या माझ्या चित्रपटाच्या वेळी मी तिला हक्काने हाक मारली आणि ती माझ्या हाकेला धावून आली. त्यातील भूमिका तिने आत्मविश्वासाने पेलली.
- अमोल पालेकर (ज्येष्ठ अभिनेते)

माझ्या लहानपणापासून मी तिला पाहत आले आहे. वयाने ती मोठी असली, तरी आमच्यात मैत्रीचे नाते होते. ती माझी चांगली मैत्रीण होती. तिच्या अभिनयाने या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले. तिच्या जाण्याने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांचे नुकसान झाले.
- निवेदिता सराफ (अभिनेत्री)

रीमाचे वागणे अतिशय दिलखुलास होते. ती उत्तम अभिनेत्री होती आणि माणूस म्हणूनही ती छान होती. आम्ही कधी एकत्र काम केले नाही; मात्र तिच्या भूमिका मी आवर्जून पाहिल्या.
- अलका कुबल-आठल्ये (अभिनेत्री)

चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिमा लागू यांच्या निधनाने एक चतुरस्र अभिनेत्री गमावली आहे. विनोदी आणि गंभीर भूमिका त्यांनी सारख्याच ताकदीने साकारल्या होत्या. विशेषत: आईची भूमिका आणि रिमा लागू हे एक समीकरणच रूढ झाले होते. ‘तू तू मै मै’, ‘श्रीमान-श्रीमती’ यांसारख्या दूरचित्रवाणीवरील मालिकांसह, ‘पुरुष’, ‘घर तिघांचं हवं’ यांसारख्या नाटकांतील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी व तमाम रसिक, एका दिग्गज अभिनेत्रीस मुकले आहेत. मराठी रंगभूमी आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून साकारलेल्या भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आई आणि सासू या भूमिका साकारल्यामुळे रूपेरी पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय आई, अशीच रिमा लागू यांची ओळख होती. आज रिमा लागू यांच्या आकस्मिक निधनामुळे या लोकप्रिय आईला आपण कायमचे गमावले असल्याची भावना आहे. आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे आणि आताच्या रिमा लागू यांनी जवळपास चार दशके रंगभूमी, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे.
- विनोद तावडे,
सांस्कृतिक कार्यमंत्री

आमच्या ‘ठष्ट’ नाटकाच्या वेळी ‘मला तुला काही तरी द्यायचे आहे,’ असे म्हणत पर्समधून १०० रुपयांची नोट काढून त्यांनी हातात ठेवली होती.
- हेमांगी कवी (अभिनेत्री)

रीमा अत्यंत सशक्त अभिनेत्री होती. तिच्या अभिनयात सहजता आणि स्वभावात साधेपणा होता. माध्यमांशी जुळवून घेऊन परिणामकारक भूमिका साकारणे, ही तिची खासियत. ‘सुपरस्टार’ची आई या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकातील स्वत:ची भूमिकाही तिला आवडायची. ‘घर तिघांचं हवं’ या नाटकामध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केले होते. यानिमित्ताने मला तिचा कसदार अभिनय जवळून अनुभवता आला. काही काळाने कलावंतांभोवती एक वलय निर्माण होते. स्वभावातला साधेपणा तिने टिकवून ठेवला. - दिलीप प्रभावळकर

रीमा ही माझी जवळची मैत्रीण होती. आम्ही तिला नयन नावाने हाक मारत असू. तिच्या निधनाची बातमी मोठा धक्का देणारी आहे.
- रमेश भाटकर

Web Title: Clever actress Rimon 'dark days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.