वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:45 PM2022-08-19T14:45:48+5:302022-08-19T14:46:38+5:30
‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
मुंबई : वातावरण बदलाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत घटकांवर होत असतो. तसाच परिणाम राज्याच्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमता विकसनावरदेखील पुढील पाच दशके होणार असल्याचे पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयआयटीएम, पुणे येथील टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन आणि पार्थसारथी मुखोपाध्याय तसेच, न्यूयॉर्क विद्यापीठ अबुधाबी येथील सेंटर फॉर प्रोटोटाईप क्लायमेट मॉडेलिंग येथील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे.
वातावरण बदलामुळे सौरऊर्जेच्या निर्मितीत घट होण्याची शक्यता देशात दिसत आहे. तसेच देशाच्या काही भागातील महत्त्वाच्या पवन ऊर्जा प्रकल्पांवरदेखील परिणाम होणार आहे. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्राकडून संशोधनासाठी अनेक क्षेत्रांमध्ये निधी दिला गेला आहे. ज्यामध्ये सोलर सेलची कार्यक्षमता वाढविणे, विंड टर्बाईन हबची उंची वाढविणे आणि मोठ्या रोटोर ब्लेडची निर्मिती या विषयांचा समावेश आहे.
अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी स्थापित यंत्रणेच्या क्षमतेमध्ये (१०.७८ गिगावॅट) महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये आहे. ज्यामध्ये पवन ऊर्जा ५.०१ गिगावॅट आणि सौर ऊर्जा २.७५ गिगावॅटचा वाटा आहे. २) महाराष्ट्रातील एकूण ऊर्जा निर्मितीमध्ये ३० जून २०२२पर्यंत २४.३६ टक्के वाटा अक्षय ऊर्जा क्षेत्राचा आहे.
सध्या देशभरातील पवन ऊर्जा निर्मितीमध्ये १५ टक्के वाटा राज्य उचलत आहे.
महाराष्ट्रात २०३०पर्यंत ४० टक्के ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील स्थापित सौर ऊर्जा क्षमता ही २०१६ आणि २०२१ च्या दरम्यान ६१४ टक्क्यांनी वाढली आहे.
२०१६मध्ये ३८५.७६ मेगावॅटवरुन २०२२मध्ये २७५३.३० मेगावॅट झाली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सौर ऊर्जेच्या क्षमतेबाबत घट होईल. वर्षभरातील सर्व ऋतूंसाठी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम भारतातील सौर विकिरण हे सर्व ऋतूंमध्ये कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सौर ऊर्जेची निर्मिती घटण्याची शक्यता आहे. पुढील पन्नास वर्षात १० ते १५ टक्के असेल. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या कालावधीतील ढगांचे आच्छादन वाढण्यानेदेखील हा परिणाम होऊ शकतो.
- पार्थसारथी मुखोपाध्याय,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिलक मेटरॉलॉजी, पुणे