‘क्लिनिकल ट्रायल्स’चे प्रमाण अवघे १.४ %

By Admin | Published: May 21, 2016 05:12 AM2016-05-21T05:12:32+5:302016-05-21T05:12:32+5:30

देशात आजारांची लागण झपाट्याने होत असली तरीही वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन उल्लेखनीय नाही.

The clinical trials are only 1.4% | ‘क्लिनिकल ट्रायल्स’चे प्रमाण अवघे १.४ %

‘क्लिनिकल ट्रायल्स’चे प्रमाण अवघे १.४ %

googlenewsNext


मुंबई : जगातील एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे देशात आहेत. देशात आजारांची लागण झपाट्याने होत असली तरीही वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन उल्लेखनीय नाही. जगात होणाऱ्या एकूण ‘क्लिनिकल ट्रायल’मधील फक्त १.४ टक्के इतक्याच ट्रायल देशात होत असल्याचे ‘इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल रिसर्च २०१६’(आयएससीआर)च्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
२० मे रोजी ‘जागतिक इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल डे’ साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून परळच्या केईएम रुग्णालयात आयएससीआरतर्फे एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देशातील ‘क्लिनिकल ट्रायल’विषयी असणारे गैरसमज आणि जागरूकतेचा अभाव मोठे अडसर असल्याचा सूर तज्ज्ञांचा होता.
आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर काम करणे, रुग्ण जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणे, फार्मसी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘क्लिनिकल ट्रायल’ हे विषय सुरू करावेत, असे उपाय सुचवण्यात आले.
जगातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोकसंख्या देशात आहे. पण, या तुलनेत संशोधनाचे प्रमाण अत्यल्प आहे. मानवासाठी नवीन औषध तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे १२ ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. १० हजार औषधी द्रव्यांचा अभ्यास केल्यास त्यापैकी केवळ १० औषधी द्रव्य ही औषधांसाठी वापरण्यास उपयुक्त असल्याचे आढळून येते. त्यामुळेच आजारांचे प्रमाण पाहता नवीन औषधनिर्मितीला चालना मिळणे आवश्यक आहे. देशात फक्त ६ टक्के केंद्र ‘क्लिनिकल ट्रायल’साठी प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध आहेत. तर, केलेल्या ‘क्लिनिकल ट्रायल’पैकी फक्त ९ टक्के ट्रायलचे डिजिटलायझेशन केले जात असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
लोगो डिझाईन स्पर्धा
आयएससीआरने लोगो बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ‘क्लिनिकल ट्रायल आणि रुग्णांसाठी त्याचे मूल्य’ ही संकल्पना दिली होती. या स्पर्धेची विजेती मेरील माम्मेन (२६) ठरली आहे. ही मुलगी जनुकीय विकृतीमुळे होणाऱ्या दुर्मीळ अशा पॉम्पे आजारग्रस्त आहे.

Web Title: The clinical trials are only 1.4%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.