नगर रस्ता बीआरटी बंद करा

By admin | Published: May 21, 2016 12:37 AM2016-05-21T00:37:47+5:302016-05-21T00:37:47+5:30

पादचारी सुरक्षिततेच्या उपाययोजना, मार्गाच्या रचनेत झालेल्या चुकांची दुरुस्ती तसेच या मार्गावरील बसचालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे

Close the city road BRT | नगर रस्ता बीआरटी बंद करा

नगर रस्ता बीआरटी बंद करा

Next


पुणे : नगर रस्ता बीआरटी मार्गावर पादचारी सुरक्षिततेच्या उपाययोजना, मार्गाच्या रचनेत झालेल्या चुकांची दुरुस्ती तसेच या मार्गावरील बसचालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या बीआरटीचे संचलन मार्ग सुरक्षित होईपर्यंत तातडीने बंद करावे, असे गोपनीय पत्र पीएमपी प्रशासनाकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या मार्गावर अनेक ठिकाणी त्रुटी असल्याने मार्ग सुरू केल्यापासून गंभीर अपघातांची मालिका सुरू असून गेल्या आठ दिवसांत एका ज्येष्ठ नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. तर मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर गेल्या २० दिवसांमध्ये पीएमपीच्या वाहनांचे ८ ते १० अपघात तर इतर वाहनांचे तब्बल १० ते १२ अपघात झालेले आहेत. त्यामुळे मार्ग सुरक्षित करूनच ही सेवा पुन्हा सुरू करणे सयुक्तिक होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
>या सुधारणा आवश्यक
संपूर्ण बीआरटी मार्गासाठी
65
वॉर्डनची आवश्यकता
संपूर्ण बीआरटी मार्गात मुख्य चौक आणि पादचारी रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे
बीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या इतर सर्व वाहनांवर कडक कारवाई करणे
टाटा गार्ड रूम चौकाचे तातडीने रुंदीकरण करून बीआरटी मार्ग पूर्ण करणे
टाटा गार्ड रूम चौकाचे तातडीने रुंदीकरण करून बीआरटी मार्ग पूर्ण करणे
विमाननगर चौक, जनकबाबा दर्गा परिसरात बॅरिकेडची लांबी वाढविणे
रँम्पची उंची वाढविणे तसेच पादचाऱ्यांना भुयारी मार्गाने जाण्याची सक्ती करणे
>बीआरटी मार्गावर झालेले अपघात
या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांची
मालिका लक्षात घेऊन महापालिका
आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपी प्रशासनास अपघातांची कारणे तसेच त्यासाठी आवश्यक
असलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पीएमपी प्रशासनाने केलेल्या अहवालात येरवडा ते जनकबाबा दर्गा या बीआरटीच्या ७ किलोमीटरच्या स्वतंत्र कॉरिडोरमध्ये तब्बल १४ अपघात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच बीआरटी मार्गावर प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर पादचारी तसेच प्रवाशांना अपघातांचा धोका आहे.
>पर्णकुटी चौक, गुंजन सिग्नल, शास्त्रीनगर चौक, कल्याणीनगर चौक, आगाखान पॅलेस, रामवाडी जकात नाका, पाचवा मैल, टाटा गार्ड रूम, विमाननगर चौक, चंदनगर सिग्नल या ठिकाणी उपाययोजनेची गरज आहे.
>जीव महत्त्वाचा,
की राजकीय प्रतिष्ठा
नगर रस्ता बीआरटीचे काम अर्धवट असल्याने या मार्गाच्या उद्घाटनाची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी या मार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने उद्घाटनास आक्षेप घेतला होता. मार्गाचे काम अर्धवट असल्याने तसेच चालकांना मार्गावर प्रशिक्षणासाठी १५ दिवस ट्रायल रन घेणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर कृष्णा हे सुटीवर गेल्यानंतर त्यांचा पदभार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे होता. या वेळी कुमार यांनी काम झाल्याचे सांगत उद्घाटनास २५ एप्रिल रोजी हिरवा कंदील दिला. त्यानंतर २६ आणि २७ एप्रिल हे दोन पीएमपीकडून या मार्गावर ट्रायल रन घेण्यात आली. तसेच मार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे भासवत २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, आता हा मार्ग सुरक्षेसाठी बंद करणे आवश्यक असतानाही राजकीय प्रतिष्ठा व या अपघातांचे राजकरण केले जात असल्याची भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मार्ग बंद करण्यास विरोध केला जात आहे.

Web Title: Close the city road BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.