गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद
By admin | Published: September 9, 2015 01:10 AM2015-09-09T01:10:44+5:302015-09-09T01:10:44+5:30
अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे शासनास अपयश आले आहे.
अलिबाग : अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे
शासनास अपयश आले
आहे. आता यंदाही गणेशोत्सव
काळात अवजड वाहनांना बंदी करून प्रवासी वाहनांकरिता आहे तो गोवा महामार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गेल्या सात वर्षांप्रमाणे अवजड वाहनांना बंदी केल्याने कोकणात जाणारा गणेशभक्त चाकरमानी जरी सुखावला असला तरी औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल घेऊन येणारे आणि तयार पक्का माल घेऊन जाणारे तब्बल ४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अन्य अवजड वाहने बंद राहणार आहेत. यामुळे औद्योगिक कारखान्यांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन ढासळणाऱ्या अर्थकारणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी नाराजी पसरली आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या तब्बल ६ हजार जादा एसटी बसेस मुंबई, परळ, भांडुप, घाटकोपर, नालासोपारा, ठाणे, कल्याण
येथून कोकणात जाणार आहेत. ही
सर्व वाहने गणेशोत्सवापूर्वीच्या पाच ते सहा दिवस आधीपासून कोकणात जाण्यास प्रारंभ करतात.
मोठ्या प्रमाणातील ही वाहनसंख्या
आणि गोवा महामार्गाची दुरवस्था
या पार्श्वभूमीवर या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना
महामार्ग क्र. १७) यावर जड व अवजड वाहनांना १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे.
या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल आॅक्सिजन व
भाजीपाला इत्यादींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)
जड वाहतुकीस बंद करण्यात आलेले मार्ग
१पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (रा.म.क्र . जुना १७) वरील पनवेल ते सिंधुदुर्गमार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावरून होणारी १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन आहे, अशा सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारापासून १७ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
२पाच दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानिमित्त २१ सप्टेंबरला रात्री आठ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
३१८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (राज्य मार्ग क्र . जुना-१७ ) वर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.
४नाशिक-ठाणे राष्ट्रीय महामार्ग
क्र . ३ वर १४ सप्टेंबरला चार वाजल्यापासून ते रात्री
बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना तसेच ट्रेलर, वाळू, रेती वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अवजड वाहने बंद राहणार
गणेशोत्सवादरम्यानच्या मुंबई ते कोकण या वाहतुकीच्या निमित्ताने गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागू करण्यात आलेल्या या अवजड वाहनांच्या बंदी निर्बंधांमुळे, कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे महाड-बिरवाडी एमआयडीसी क्षेत्रातील ५००च्या वर, रोहा औद्योगिक वसाहतीतील ४५०, विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील २५०, रसायनी औद्योगिक क्षेत्रातील ६००, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ७५०, पनवेल औद्योगिक क्षेत्रातील ४५० तर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ५५० व अन्य सुमारे ५०० अशी एकूण सुमारे साडेचार हजार अवजड वाहने या काळात बंद राहतात़ असा गेल्या चार ते पाच वर्षांतील अनुभव असून, त्याचा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या उत्पादकता आणि वितरणावर मोठा विपरीत परिणाम होतो, अशी माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. विनोद देशमुख यांनी दिली आहे.
थळ-वायशेत आर.सी.एफ. खत कारखाना, हिंदुस्थान पेट्रोलियम एलपीजी गॅस बॉटलिंग प्लान्ट (खानाव-अलिबाग), जेएसडब्लू इस्पात, पीएनपी पोर्ट, रिलायन्स (नागोठणे), रिलायन्स (पाताळगंगा), भूषण स्टील, उत्तम गॅल्व्हा स्टील आदी मोठे कारखाने व बंदरातील अवजड वाहनांनाही या काळात बंदी आहे.