भाषिक राजकारण बंद करा - नितीन गडकरी
By admin | Published: August 4, 2014 03:34 AM2014-08-04T03:34:37+5:302014-08-04T03:34:37+5:30
मुंबई शहर समस्यांनी ग्रासले आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या सहमतीने ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ची गरज आहे
मुंबई : मुंबई शहर समस्यांनी ग्रासले आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या सहमतीने ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ची गरज आहे. मात्र, मुंबईच्या समस्या भाषिक किंवा धार्मिक नाहीत त्यामुळे असे राजकारण बंद करा, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना व मनसेला फटकारले.
वांद्रेतील नॅशनल महाविद्यालयात मुंबई भाजपाध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या ‘मुद्देसुद’ या विधिमंडळातील भाषणांच्या संग्रहाचे प्रकाशन झाले. या वेळी गडकरी म्हणाले, मुंबईत पाणी व वायुप्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे.
केंद्रातील मोदी सरकार विकासाचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहे. गरिबांना मोदी सरकार प्राधान्य देईलच मात्र मतांसाठी लोकप्रिय घोषणा अथवा जातीपातीचे वा भाषेचे राजकारण करणार नाही, असे ते म्हणाले. वांद्रे-वरळी सागरी सेतू थेट विरारपर्यंत नेण्याचा आमचा प्रस्ताव होता. आता सागरी सेतूला भुयारी मार्गासारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शहराच्या सागरी सौंदर्यासाठी सेतूऐवजी टनल, जलवाहतुकीसारख्या पर्यायांचा विचार व्हायला हवा. मुंबईच्या पायाभूत विकासासाठी तब्बल १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारला हा निधी मिळवून देण्यास आपण पंतप्रधानांकडे आग्रह करण्यास तयार असल्याचे गडकरी म्हणाले.
या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार उपस्थित होते. (प्रतिनिधी)