"'या' चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा, तडफडून मरतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 11:17 AM2022-07-07T11:17:50+5:302022-07-07T11:20:13+5:30
"शिवसेना त्याच जोमाने उभी राहू शकते, केवळ चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील,"
राज्यात 20 जूनला झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार उलथवून टाकत भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचे सरकार आणले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट बुधवारी आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत आदींवर जोरदार हल्ला चढवला. "या चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील," असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
...हे तडफडून मरतील -
संजय शिरसाट म्हणाले, "एखाद्याचा राग समजू शकतो. पण ५० आमदार जातात तेव्हा त्याचे गांभीर्य समजून घेत नाहीत. आजही ते गर्वात आहेत, गेले तर गेले, गेले तर गेले, असे म्हणून-म्हणून शिवसेना संपवण्याच्या मागे ही जी चांडाळ चौकडी लागली आहे ना, ती उद्धव साहेबांच्या लक्षात यायला हवी," असे माझे मत आहे. यावर, ही चांडाळ चौकडी जर बाजूला सरकली, तर तुम्ही परत उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? असे एका पत्रकाराने विचारले असता, "शिवसेना त्याच जोमाने उभी राहू शकते, केवळ चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील," असेही शिरसाट म्हणाले.
राऊतांवर थेट हल्ला -
संजय राऊतांवर हल्ला चढवताना शिरसाट म्हणाले, "संजय राऊत सकाळी उठून काय अॅक्शन करतात काय माहीत, बरं झालं ते अमिताभ बच्चन सारखे हॅन्डसम नाहीत. त्यांनी जे वाक्य वापरले ते माझ्या मनाला छेद करून गेले. सत्ता गेली उडत, पण जेव्हा आम्ही ३९ लोक आणि ११ अपक्ष आमदार गोवाहाटीला होतो, त्यांनी असे वाक्य वापरले, की गेलेले वेश्या आहेत. त्यात चार महिला होत्या. त्या आमच्या जवळ रडल्या, म्हणाल्या हे काय म्हणत आहेत? सर्वजण तुम्ही वैश्या आहात, त्यांच्या गळ्यात पाटी लटकवा आणि त्यांना कामाठीपुऱ्यात बसवा. मी कालही एका चॅनलसोबत बोलताना सांगितले, की जर यांची आई, बहीण त्या ठिकाणी असती, तर काय झाले असते? ते असे बोलले असते? शिवसेना प्रमुख असते ना, तर xxxx वर लाथ मारून एका मिनिटांत त्यांना बाहेर केले असेते. पण हे चालले आहे. शिवसेना बुडवण्याचे काम हे लोक करत आहेत."
आम्ही गद्दार नाही आम्ही उठाव केला आहे -
आम्ही गद्दार नाही आम्ही उठाव केला आहे. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. आम्ही कधीही शिवसेनेच्या विरोधात बोलणार नाही, शिवसेना प्रमुखांच्या विरोधात तर नाहीच नाही. आमची ठाकरे कुटुंबातील कुणाच्याही विरोधात बोलायची इच्छा नाही. ते आम्हाला नेहमीच आदरणीय राहतील, असेही शिरसाट यावेळी म्हणाले.
सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा -
यावेळी शिरसाट यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसे, असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नाही, रेकॉर्डवर आहे, असेही ते म्हणाले.